व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

“शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायाला प्रधान व्यवसायाचे स्थान द्या;महाराष्ट्र देशातील दुग्धक्रांतीचे केंद्र बनू शकतो”-आ.सुरेश धस

आष्टी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शन मेळाव्यात पंजाबच्या डेअरी तज्ज्ञांचे शास्त्रोक्त दुग्ध व्यवसायाचे मार्गदर्शन; आधुनिक व्यवस्थापनावर भर

0

click2ashti-महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक संपन्नता आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या जिद्दीमुळे राज्याला देशातील दुग्ध उत्पादनाचे अग्रस्थान मिळविण्याची क्षमता आहे.त्यामुळे युवकांनी दुग्ध व्यवसाय हा केवळ पूरक नव्हे,तर शेतीसोबतचा प्रधान व्यवसाय म्हणून स्वीकारून नियोजनबद्ध पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा,असे प्रतिपादन आमदार सुरेश (आण्णा) धस यांनी केले.आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघाच्या वतीने आयोजित दुग्ध उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पंजाबचे डेअरी तज्ज्ञ हरप्रीत सिंग, संदीप सिंग, वामन (दादा) गायकवाड, संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले,तानाजी हैदर,हनुमंत पंच,गणेश अंतरे (सोनगाव, ता. राहुरी),रामनाथ बदक (संगमनेर),प्रोग्रेसिव्ह बिल्डर फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव जयवंत ताकणे, आधुनिक दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ भरत (काका) गळभोर तसेच संघाचे संचालक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते.
आमदार धस म्हणाले की, महाराष्ट्रातील युवकांनी शेतीसोबत आधुनिक आणि शास्त्रोक्त दुग्ध व्यवसाय स्वीकारल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते.गाईंच्या पैदाशीसाठी दर्जेदार सेक्स सॉर्टेड सिमेन वापरणे,योग्य खाद्य,प्रोटीन,मिनरल मिक्स्चर आणि वैज्ञानिक व्यवस्थापन यामुळे अधिक दूध देणाऱ्या कालवडी तयार होऊ शकतात.आज २० लिटर दूध देणाऱ्या गाईच्या पुढील पिढीत २५ ते ३० लिटर दूध देण्याची क्षमता निर्माण करता येते,असे त्यांनी सांगितले.दूध भेसळीचा विषय उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक भेसळ करत नाहीत; मात्र काही मोजक्या भामट्यांमुळे संपूर्ण उद्योगाची प्रतिमा खराब होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईचे त्यांनी कौतुक केले.
पंजाबचे प्रगत दुग्ध व्यावसायिक संदीप सिंग यांनी गाईंच्या योग्य ब्रीडिंग, फीडिंग आणि गोठा व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. योग्य नियोजन केल्यास २० ते ३० गाईंच्या दुग्ध व्यवसायातून जिल्हाधिकाऱ्यांच्या वेतनाइतके आर्थिक उत्पन्न मिळविणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला. पशुखाद्याची गुणवत्ता, बुरशीमुक्त चारा, युरियामुक्त खाद्य, उत्तम मुरघास आणि शास्त्रोक्त व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
हरप्रीत सिंग यांनी आधुनिक डेअरी फार्मिंगमध्ये वैज्ञानिक गोठा, स्वच्छता, संतुलित आहार आणि गाईंच्या आरोग्य व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व असल्याचे सांगितले. पारंपरिक गोठ्यांऐवजी आधुनिक ‘व्ही-टाईप’ गोठे उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. गाईंच्या गरजेनुसार व्यवस्थापन केल्यास एका गाईपासून दहा महिन्यांत सुमारे ४.७३ लाख रुपयांच्या दूध उत्पादनाची क्षमता निर्माण करता येते, असा अनुभव त्यांनी मांडला.२०१६ मध्ये अवघ्या तीन गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय आज चार कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रातही पंजाबप्रमाणे दुग्धक्रांती घडविण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला.मेळाव्यात उपस्थित दूध उत्पादकांनी आधुनिक दुग्ध व्यवसायातील विविध तांत्रिक बाबींविषयी तज्ज्ञांशी संवाद साधत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी व दूध उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.