आष्टीत २७ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’;विविध शासकीय योजनांचा नागरिकांना एकाच ठिकाणी लाभ-तहसिलदार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजन;आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित
click2ashti-महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच नागरिकांच्या शासकीय कामांना गती मिळावी या उद्देशाने सोमवार(दि.२७)रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालय,नगर–बीड रोड येथे’छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’आयोजित करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश धस राहणार असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान,अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुढे बोलतांना तहसिलदार पाटील म्हणाल्या,या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुबे,तालुका आरोग्य अधिकारी रामदास मोराळे,गटविकास अधिकारी प्रयाग ठमाळ व संतोष माने,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,ओमकार शेळके व अमृत गांगर्डे,तसेच तहसीलदार सुरेश घोळवे,दत्तात्रय निलावाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या शासकीय योजनांशी संबंधित अर्ज,तक्रारी व प्रलंबित कामांवर मार्गदर्शन करणार आहेत.या समाधान शिबिरामध्ये महसूल,पंचायत राज,कृषी,आरोग्य,पोलीस,सामाजिक न्याय, ग्रामविकास तसेच इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना जागेवरच आवश्यक मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार आहे.नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.