उद्या आष्टीत मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिर;गुडघा,मणका,कंबरदुखीवरील शस्त्रक्रियांसह उपचार मोफत
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम;आ.सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आयोजन,देशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
click2ashti-मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जिल्हा प्रशासन,बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.५) ऑगस्ट रोजी आष्टी येथे भव्य मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या शिबिरात गुडघेदुखी,कंबरदुखी, मणक्याचे विकार,मानदुखी,नस दाबली जाणे तसेच खुबा (हिप) बदलण्यासारख्या गंभीर अस्थिरोगांवरील तपासणी,निदान आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसह उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील ऊसतोड कामगार,हमाल,कांदा उत्पादक शेतकरी तसेच दिवसभर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांमध्ये सांधे, मणका व गुडघ्यांच्या विकारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. अशा गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात देशातील प्रख्यात मणका व अस्थिरोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. शेखर भोजराज,डॉ.मधुसूदन अग्रवाल यांच्यासह अजंठा फार्मा, संजीवनी ममता हॉस्पिटल (मुंबई),साईदीप हॉस्पिटल(अहिल्यानगर)
,विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय(अहिल्यानगर),वेलनेस हॉस्पिटल (बीड),तसेच केईएम हॉस्पिटल,जे.जे.हॉस्पिटल,ससून रुग्णालय आणि रुबी हॉल क्लिनिक,पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.
तपासणीनंतर आवश्यकतेनुसार एमआरआय,विविध वैद्यकीय चाचण्या, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार मुख्यमंत्री सहाय्यता निधी व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे राज्य समन्वयक डॉ.रितेश पाटील यांनी शिबिराच्या नियोजनाचा आढावा घेतला.गुडघा,कंबर,मान किंवा मणक्याच्या त्रासामुळे शस्त्रक्रियेबाबत कोणताही गैरसमज किंवा भीती न बाळगता सर्व गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
आष्टी व परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर आरोग्यसेवेची सुवर्णसंधी ठरणार असून,हजारो रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत उपचार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.