‘पटवा,हटवा’च्या मागणीला यश;अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळातून डॉ.महेंद्र पटवांची हकालपट्टी!
कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मानद मंत्री पदावरून निलंबित; कडा बंद आंदोलनानंतर संस्थेचा मोठा निर्णय
click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर‘पटवा,हटवा’अशी मागणी करत कडेकरांनी शहर कडकडीत बंद ठेवले होते.या आंदोलनानंतर आता श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ, कडा यांनी डॉ.महेंद्र रसिकलाल पटवा यांच्यावर मोठी कारवाई केली असून,त्यांची संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री.योगेश सुमतीलालजी भंडारी यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र समोर आले आहे.दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ,कडा यांच्या कार्यकारी मंडळाच्या तातडीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे डॉ.महेंद्र रसिकलाल पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
कडेकरांच्या आंदोलनानंतर संस्थेची कारवाई कडा येथील १९ वर्षीय तरुणीने डॉक्टर महेश पटवा यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ७४, ७५(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद कडा शहरात उमटले. संबंधित व्यक्तीचा संस्थेशी असलेला संबंध आणि संस्थेतील पद यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.डॉ.पटवा यांना अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदावरून हटवावे, या मागणीसाठी नागरिकांनी ‘पटवा, हटवा’चा नारा देत कडा बंदचे आवाहन केले.कडेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शहरातील व्यवहार बंद ठेवले.या आंदोलनातून नागरिकांचा संताप आणि कारवाईची मागणी तीव्र असल्याचे दिसून आले.
तातडीची बैठक घेऊन निर्णय
या पार्श्वभूमीवर अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.बैठकीत झालेल्या निर्णयानुसार डॉ.महेंद्र रसिकलाल पटवा यांना कार्यकारी मंडळाच्या मानद मंत्री पदावरून निलंबित करण्यात आले आहे.संस्थेच्या अधिकृत लेटरहेडवर देण्यात आलेल्या पत्रात हा निर्णय स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे कडेकरांनी केलेल्या ‘पटवा, हटवा’च्या मागणीला संस्थेच्या पातळीवर मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
आता पुढील कारवाईकडे लक्ष
दरम्यान,या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून,तरुणीने केलेल्या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.त्यामुळे संस्थेने घेतलेल्या निलंबनाच्या निर्णयानंतर आता पोलिस तपासात काय निष्पन्न होते आणि संबंधित डॉक्टरविरुद्ध पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते,याकडे कडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे पोलिसांत दाखल झालेला गुन्हा आणि दुसरीकडे संस्थेच्या पदावरून झालेली हकालपट्टी,यामुळे कडा परिसरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.नागरिकांच्या आंदोलनानंतर संस्थेने तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.