व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘पटवा,हटवा’च्या मागणीने कडा कडकडीत बंद

१९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर डॉक्टरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदावरून हटविण्याची कडेकरांची मागणी

0

click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ७४, ७५(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली असून,संबंधित व्यक्तीला अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदावरून हटवावे आणि त्यांचा डॉक्टरकीचा परवाना रद्द करावा,या मागणीसाठी कडेकरांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला.
कडा येथील म्हेत्रे वस्ती परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार,ती उपचारासाठी पटवा हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यावेळी डॉक्टर महेंद्र पटवा यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे.या तक्रारीची दखल घेत आष्टी पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध BNS मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती परिसरात पसरताच कडा शहरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कडा शहरातील विविध भागांमध्ये या बंदला प्रतिसाद मिळाला.व्यापारी,नागरिक आणि विविध घटकांनी दुकाने बंद ठेवून या मागणीला पाठिंबा दर्शविला.त्यामुळे नेहमी गजबजलेल्या कडा शहरातील प्रमुख बाजारपेठेत दिवसभर शांतता दिसून आली.
दरम्यान,या घटनेमुळे कडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकडे तसेच अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते,याकडे कडेकरांचे लक्ष लागले आहे.
‘पटवा,हटवा’चा नारा
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महेंद्र पटवा हे आष्टी तालुक्यातील अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळात संचालक म्हणून कार्यरत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. संबंधित व्यक्तीला या पदावरून तत्काळ हटवावे, तसेच डॉक्टरकीचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी कडेकरांनी केली आहे. या मागणीसाठी ‘पटवा, हटवा’ असा नारा देत नागरिकांनी शहर बंद ठेवले.
पोलिस तपासाकडे लक्ष
या प्रकरणात आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता पोलिसांकडून घटनेची चौकशी केली जात आहे. तरुणीने केलेल्या आरोपांची सत्यता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.