व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बहुप्रतीक्षित रेल्वे सेवेला हिरवा कंदील; बीड ते पुणे सात तासांचा प्रवास, आष्टीकरांसाठी रात्री ११ वाजता पुण्याची गाडी

बीड-पुणे रेल्वे अखेर धावली!

0

click2ashti-गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्यातील नागरिकांच्या प्रतीक्षेत असलेली बीड-पुणे रेल्वे सेवा अखेर सुरू झाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित रेल्वे सेवेला सुरुवात करण्यात आली असून, रेल्वे विभागाने गाडीचे अधिकृत वेळापत्रक जारी केले आहे. त्यामुळे बीड, आष्टी तसेच मार्गावरील प्रवाशांना पुण्याशी थेट रेल्वेने जोडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे-बीड गाडी क्रमांक ११४३३ आणि बीड-पुणे गाडी क्रमांक ११४३४ अशा दोन्ही दिशेने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बीडहून पुण्याला जाण्यासाठी साधारण सात तासांचा कालावधी लागणार असून,प्रवासादरम्यान एकूण नऊ स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आष्टीकरांसाठीही या रेल्वेचे वेळापत्रक महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्याहून येणारी रेल्वे न्यू आष्टी स्थानकावर पहाटे ३.०३ वाजता पोहोचणार आहे,तर बीडहून पुण्याकडे जाणारी रेल्वे न्यू आष्टी स्थानकावर रात्री ११.०३ वाजता पोहोचून दोन मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे रवाना होणार आहे.
पुणे-बीड रेल्वेचे वेळापत्रक
गाडी क्रमांक ११४३३ पुणे-बीड ही रेल्वे पुणे स्थानकावरून रात्री १०.४५ वाजता सुटणार आहे.त्यानंतर उरुळी कांचन येथे रात्री ११.०९ वाजता पोहोचून ११.११ वाजता रवाना होईल. दौंड येथे रात्री १२.१३ वाजता आगमन होऊन १२.१५ वाजता पुढे रवाना होईल. श्रीगोंदा रोड येथे रात्री १२.३८ वाजता पोहोचून १२.४० वाजता सुटेल.आहिल्यानगर येथे पहाटे १.३० वाजता रेल्वे पोहोचणार असून,येथे दहा मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर पहाटे १.५८ वाजता नारायण डोह येथे पोहोचून २ वाजता पुढे रवाना होईल.न्यू आष्टी येथे पहाटे ३.०३ वाजता आगमन होऊन ३.०५ वाजता रेल्वे बीडकडे रवाना होईल. त्यानंतर अंमळनेर भांड्याचे येथे पहाटे ३.३३ वाजता पोहोचून ३.३५ वाजता सुटेल आणि अखेर बीड येथे सकाळी ६ वाजता पोहोचणार आहे.
बीड-पुणे रेल्वेची वेळ
याच मार्गावर गाडी क्रमांक ११४३४ बीड-पुणे ही रेल्वे बीड स्थानकावरून रात्री ९.३० वाजता सुटणार आहे.अंमळनेर भांड्याचे येथे रात्री १०.३८ वाजता पोहोचून १०.४० वाजता रवाना होईल. न्यू आष्टी येथे रात्री ११.०३ वाजता रेल्वे पोहोचणार असून ११.०५ वाजता पुढे रवाना होईल.नारायण डोह येथे रात्री १२.२३ वाजता आगमन होऊन १२.२५ वाजता रेल्वे सुटेल. आहिल्यानगर येथे रात्री १२.५५ वाजता पोहोचून दहा मिनिटांच्या थांब्यानंतर पहाटे १.०५ वाजता रवाना होईल. श्रीगोंदा रोड येथे पहाटे १.५८ वाजता, दौंड येथे २.५८ वाजता आणि उरुळी कांचन येथे ३.४४ वाजता रेल्वे पोहोचणार आहे.अखेर पुणे स्थानकावर पहाटे ५.२० वाजता ही रेल्वे पोहोचणार आहे.
आहिल्यानगर-बीड रेल्वेही सुरूच राहणार
दरम्यान,सध्या नियमित सुरू असलेली आहिल्यानगर-बीड रेल्वे सेवा बंद होणार नसून ती पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याबरोबरच आहिल्यानगर आणि पुढील भागाशी रेल्वेने जोडले जाण्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
बीड जिल्ह्याला पुण्याशी थेट रेल्वे जोडणी मिळावी,ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.शिक्षण,नोकरी,व्यवसाय,वैद्यकीय उपचार तसेच विविध कामांसाठी पुण्याकडे मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही रेल्वे सेवा महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः आष्टी तालुक्यातील प्रवाशांना न्यू आष्टी स्थानकावरून पुणे आणि बीडकडे जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे.बहुप्रतीक्षित बीड-पुणे रेल्वे प्रत्यक्ष रुळावर धावू लागल्याने बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून आता बीड जिल्हा पुण्याशी थेट रेल्वे मार्गाने जोडला गेल्याने या मार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वे विभागाने जारी केलेले वेळापत्रक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.