व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तोंड दाबून बळजबरी केल्याची फिर्याद;घाबरलेल्या महिलेची आष्टी पोलिस ठाण्यात धाव

आरोपींमध्ये बाप-लेकाचा समावेश;दोन अनोळखी व्यक्तींविरुद्धही गुन्हा

0

click2ashti-पोटाची खळगी भरण्यासाठी मंगल कार्यालयात काम करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेवर दिवसाढवळ्या बळजबरीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना आष्टी तालुक्यात समोर आली आहे. या घटनेनंतर भयभीत झालेल्या महिलेने रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्यावर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या फिर्यादीवरून बाप-लेकासह चार जणांविरुद्ध बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात संबंधित महिला कामगार म्हणून काम करते.सोमवारी दुपारी सुमारे २ वाजून २४ मिनिटांनी कडा येथील व्यापारी हेमंत गोकुळ मेहेर हा महिला काम करत असलेल्या किचनमध्ये आला.त्याने महिलेला काम सोडण्यासंदर्भात जाब विचारत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यावेळी संबंधित महिलेने आपण केवळ मजूर असून मालक आणि त्यांच्यातील व्यवहारात आपल्याला घेऊ नये,असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानंतर हेमंत मेहेर याने महिलेला मारहाण करून खाली पाडले.त्यावेळी त्याचा मुलगा संदेश मेहेर याच्यासह अन्य दोन व्यक्ती तेथे उपस्थित असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या चौघांनी महिलेला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे.यानंतर महिला एकटी असल्याची संधी साधून हेमंत मेहेर याने तिला जबरदस्तीने खाली पाडले.महिलेने प्रतिकार करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या तोंडावर रुमाल ठेवून आवाज बंद केला आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास महिला,तिचा पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने काही काळानंतर रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाणे गाठून आपली व्यथा पोलिसांसमोर मांडली.महिलेच्या फिर्यादीवरून हेमंत गोकुळ मेहेर, संदेश हेमंत मेहेर (रा.कडा,ता.आष्टी) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी करीत आहेत.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे आणि सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली.घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातूनही आवश्यक तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.