व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पावसाअभावी आष्टी-पाटोदा-शिरूर कासारमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान;पंचनामे करून मदतीसाठी आ.धसांचा शासनस्तरावर पाठपुरावा

शेतकऱ्यांनी घाबरू नये;हेक्टरी अनुदान मिळवून देऊ !

0

click2ashti-पावसाने दडी मारल्याने आष्टी,पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यांतील खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.सोयाबीन,तूर,उडीद,मूग,मका,बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, सरकारकडून मिळणारे हेक्टरी अनुदान सरसकट मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू,अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली.
आष्टी तालुक्यात ६८ हजार ५५० हेक्टर, पाटोदा तालुक्यात ५८ हजार ९१३ हेक्टर, तर शिरूर कासार तालुक्यात ४७ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली असून, पेरणीपासून मशागतीपर्यंत केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळली आहे.“आता कसं होईल, काय होईल, या चिंतेत शेतकऱ्यांनी राहू नये. सुरेश धस जिवंत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शासनाकडून जे हेक्टरी अनुदान मिळेल, ते सरसकट मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,” असा विश्वास आमदार धस यांनी व्यक्त केला.पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात पाऊस झाला नाही तर फळबागांवरही मोठे संकट येण्याची शक्यता असून, फळबागा वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
चाऱ्याचा प्रश्नही गंभीर‌ खरीप पिकांचे नुकसान झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हिरवा चारा आणि कडबा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावा,अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.