विनयभंग प्रकरणातील आरोपी डॉ.महेंद्र पटवा यांच्यावर आहिल्यानगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरूच;‘शासकीय रुग्णालयात उपचार का नाही?’नागरिकांचा सवाल
१२ दिवसांपासून रुग्णालयात उपचार;अटकेचा मार्ग पुन्हा लांबणीवर?
click2ashti-विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी असलेले डॉ.महेंद्र पटवा हे गेल्या १२ दिवसांपासून आहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी अद्याप उपचाराची गरज असल्याचे पत्र पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे डॉ. पटवा यांच्या अटकेची कारवाई तूर्तास लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र,या संपूर्ण प्रकरणावरून आता नागरिकांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
विनयभंगाच्या गंभीर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीच्या अटकेची कारवाई अपेक्षित असते.मात्र,डॉ. पटवा हे मागील बारा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यातच रुग्णालय प्रशासनाकडून उपचारांसाठी आणखी कालावधी आवश्यक असल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांची पुढील भूमिका काय असणार,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.उपचाराची गरज आहे, मग शासकीय रुग्णालयाचा पर्याय का नाही?डॉ.पटवा यांच्यावर सध्या सुरू असलेले उपचार वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक असतील,तर त्यासाठी शासकीय रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे का? उपलब्ध असल्यास आरोपीला शासकीय रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार आणि पोलिसांची कायदेशीर प्रक्रिया एकाच वेळी सुरू ठेवता आली नसती का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय पत्राच्या आधारे अटकेची प्रक्रिया किती काळ पुढे ढकलली जाऊ शकते,याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. अर्थात,आरोपीची वैद्यकीय स्थिती आणि उपचाराबाबतचा अंतिम निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विषय असला,तरी या प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘डॉ.पटवांची एवढी काळजी का?’
या प्रकरणात आरोपीवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.उपचाराच्या कारणामुळे कारवाई लांबत असेल, तर पोलिसांकडून त्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.‘आरोपीला वैद्यकीय उपचाराचा पूर्ण अधिकार आहे;मात्र त्याचबरोबर कायद्याची प्रक्रिया देखील सुरू राहायला हवी,’अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे डॉ.पटवा यांच्या उपचाराची सद्यस्थिती,वैद्यकीय अहवालाचे स्वरूप आणि पोलिसांची कायदेशीर भूमिका याबाबत अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक बनले आहे.
‘डॉक्टर पटवा पोलिसांचे जावई आहेत का?’
दरम्यान,अटकेची कारवाई लांबत असल्याने संतप्त नागरिकांकडून ‘डॉक्टर पटवा पोलिसांचे जावई आहेत का?’असा बोचरा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस आरोपीची एवढी काळजी का घेत आहेत,असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.या सवालामागे पोलिसांच्या कारवाईबाबत निर्माण झालेली शंका आणि अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली,आरोपीच्या अटकेसंदर्भात कायदेशीर स्थिती काय आहे आणि वैद्यकीय उपचारांबाबत पुढील निर्णय काय घेतला जाणार,हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
विनयभंगाच्या प्रकरणात तपास सुरू असताना आरोपी गेल्या १२ दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.वैद्यकीय कारणास्तव अटक पुढे ढकलली जात असेल,तर उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिस तत्काळ कायदेशीर कारवाई करणार का,हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे.नागरिकांच्या प्रश्नांना पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर मिळणार का आणि डॉ.पटवा यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई कधी होणार,याकडे आष्टी तालुक्याचे लक्ष लागले आहे.