व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी पोलिस ठाण्यातील शांतता समितीच्या बैठकीतच अशांतता!

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना,पत्रकारांना निमंत्रण नसल्याने संताप;भर उन्हात खुर्च्यांअभावी नागरिकांची गैरसोय,नियोजनावर प्रश्नचिन्ह

0

click2ashti-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आष्टी पोलीस ठाण्यातील शांतता समितीची बैठक शुक्रवारी चांगलीच वादळी ठरली. गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे शांतता समितीच्या बैठकीतच नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था,मिरवणुका,ध्वनिक्षेपक,वाहतूक तसेच मंडळांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते.मात्र,प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच न मिळाल्याने बैठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
शांततेच्या बैठकीतच‘निमंत्रणाचा’गोंधळ!
बैठकीसाठी कोणत्या मंडळांना निमंत्रित करण्यात आले? निमंत्रितांची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली? शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीपासून दूर का ठेवण्यात आले? याबाबत स्पष्टता देण्यात यावी,अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा उत्सव असताना त्याच्या नियोजनासाठीच्या बैठकीतच काही मंडळांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली.
भर उन्हात बैठक; नागरिक उभे, खुर्च्या मात्र अपुऱ्या!
दरम्यान, बैठकीच्या आयोजनावरून आणखी एक मुद्दा चर्चेत आला. भर उन्हात बैठक आयोजित करण्यात आल्याने बैठकीसाठी आलेल्या अनेक नागरिकांना पुरेशा आसनव्यवस्थेअभावी उभे राहावे लागल्याचे उपस्थितांनी सांगितले. पोलीस ठाण्याच्या आवारात उपलब्ध असलेल्या खुर्च्यांपैकी काही खुर्च्यांवर नव्याने नियुक्त झालेले काही पोलीस पाटील कर्मचारी बसल्याचेही उपस्थित नागरिकांनी सांगितले.शांतता समितीच्या बैठकीला नागरिक,मंडळांचे पदाधिकारी आणि विविध घटक उपस्थित असताना त्यांच्या मूलभूत आसनव्यवस्थेचीही योग्य काळजी घेतली गेली नाही,अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
वरिष्ठांकडे तक्रारी;आता स्पष्टीकरणाची मागणी
या प्रकाराबाबत काही नागरिक तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आष्टी पोलीस ठाण्यातील शांतता समितीच्या बैठकीचे नियोजन, निमंत्रणाची पद्धत आणि आसनव्यवस्था याबाबत वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.मात्र, समन्वयासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होत असेल,तर आगामी गणेशोत्सवाचे नियोजन नेमके कसे होणार?असा सवाल आष्टीकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.