‘माझे चारित्र्यहनन करण्याचा केविलवाणा प्रयत्न’;प्राजक्ता धस यांचा माजी आ.बाळासाहेब आजबेंना इशारा
जमिनींबाबतचे आरोप सिद्ध करून दाखवा;अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
click2ashti-दुष्काळी मोर्चामध्ये पाणी,दूध उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी माझे चारित्र्यहनन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.माझ्यावर करण्यात आलेले आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सिद्ध करून दाखवावेत;अन्यथा आपण त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा प्राजक्ता धस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिला आहे.
माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सोमवार दि.२८ रोजी बीड येथे झालेल्या मोर्चात भाषणातुन‘मॅडमला आवरा’असा उल्लेख करून प्राजक्ता धस यांच्यावर जमीन बळकावल्याचे आरोप केला होता.त्या आरोपाला आज प्राजक्ता धस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन उत्तर दिले असून दिलेल्या पत्रकात त्यांनी असे सांगितले की,‘मॅडमला आवरा’असे म्हणणाऱ्या बाळासाहेब आजबे यांनीच आपल्या जिभेला आवर घालावा.माझ्यावर पिंपळा,पुंडी,पांढरी, सोलेवाडी,तवलवाडी,इमनगाव,हनुमंतगाव,शिदेवाडी,शिराळ,चिंचपूर तसेच आष्टी परिसरातील जमिनी घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत.या आरोपांपैकी एकाही जमिनीबाबत माझ्याकडे नोटरी,साठेखत,खरेदीखत किंवा सातबारा असल्यास त्यांनी तो पुरावा जनतेसमोर सादर करावा,असे जाहीर आव्हान त्यांनी दिले.
पुंडी येथील जमीन सन 2012 मध्ये,म्हणजे सुमारे 14 वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली असून सर्व जमिनींचा उल्लेख निवडणूक शपथपत्रात करण्यात आलेला आहे.आपण दुग्ध व्यवसायासह इतर नोंदणीकृत कंपन्यांच्या माध्यमातून व्यवसाय करत असून नियमितपणे आयकर विवरणपत्र भरत असल्याचेही प्राजक्ताताई धस यांनी स्पष्ट केले.हनुमंतगाव येथील देशमुखांची जमीन तसेच शिदेवाडी येथील काझी कंपनीची जमीन वतनदारांची असून त्यांचा माझ्याशी विनाकारण संबंध जोडला जात आहे,असा दावाही त्यांनी केला.
‘जमिनीचा वाद मिटविण्याचा सल्ला दिला’
भीमराव धोंडे यांचे कार्यकर्ते हेमंत मेहेर यांच्याविरुद्ध महिलेला उभे करून खोटी केस करण्यात आल्याचा आरोपही प्राजक्ता धस यांनी केला.या प्रकरणात जमीनविषयक वाद असल्याने दोन्ही बाजू माझ्याकडे आल्या होत्या.जमीन मोजून घ्यावी,वाद मिटवावा आणि जमीन विकू नये,असा सल्ला आपण दोन्ही बाजूंना दिला होता. त्यामुळे याचा बाळासाहेब आजबे यांनी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही,असे त्यांनी सांगितले.
‘योग्य वेळी पुरावे जनतेसमोर आणू’
बाळासाहेब आजबे हे सातत्याने माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत प्राजक्ता धस म्हणाल्या की,‘तुमचीच नैतिकता काय आहे?’याचे पुरावे माझ्याकडे आहेत.योग्य वेळी ते जनतेसमोर आणले जातील,असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच दादेगाव देवस्थानच्या जमिनीबाबतही त्यांनी आजबे यांच्यावर आरोप केले.या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींकडून किंवा अधिकृत कागदपत्रांतून सत्यता स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
‘राजकीय नैराश्यातून आरोप’
बाळासाहेब आजबे यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांचा जनाधार एक लाख मतांनी कमी झाला असल्याचा दावा प्राजक्ता धस यांनी केला.याच नैराश्यातून माझ्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.मात्र आरोपांचा अतिरेक झाल्याने आता आपण अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘भाऊसाहेब आजबे यांचे वारस असतील तर माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवावेत,’असे आव्हान देत प्राजक्ता धस यांनी बाळासाहेब आजबे यांनी जिभेला आवर घालावा,असा सज्जड इशारा दिला.