व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘दुष्काळी मोर्चा नव्हे, राजकीय स्वार्थासाठीचे नाटक!’

माजी आमदार भीमराव धोंडे व बाळासाहेब आजबे यांच्यावर आ. सुरेश धस यांचा घणाघाती आरोप; ‘जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न’

0

click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी मोर्चावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.‘हा मोर्चा मतदारसंघाच्या हितासाठी नसून सरकारच्या विरोधात स्वतःचे राजकीय हित साधण्यासाठी आयोजित केलेले नाटक आहे,’ असा घणाघाती आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला.
आष्टी येथील एका मंगल कार्यालयात शनिवार (दि.२६) रोजी दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस बोलत होते.यावेळी त्यांनी दुष्काळी मोर्चाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी आमदारांवर जोरदार टीका केली.
‘हम साथ साथ है’च्या नावाखाली केवळ जनतेची दिशाभूल!
आमदार धस म्हणाले की,आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आपण यापूर्वीच शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.त्यामुळे आता अचानक दुष्काळी मोर्चाचे आयोजन करण्यामागे नेमका उद्देश काय,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.हा मोर्चा म्हणजे‘हम साथ साथ है’अशा पद्धतीचा असून त्यामध्ये ठोस तथ्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
जायकवाडीच्या पाण्यासाठी जानेवारीतच मुख्यमंत्र्यांकडे पत्र
आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील दुष्काळी छायेतील गावांमधील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडी प्रकल्पातून उपसा सिंचन योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी आपण यापूर्वीच केली असल्याचे आ. धस यांनी सांगितले.यासाठी जावक क्र. ०३१/२०२५, दि. ०७ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्राची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत जलसिंचन विभागामार्फत पत्र क्र. विकाक-२०२५/प्र.क्र.३४/लपा, दि. २८ जानेवारी २०२५ रोजी कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांना पुढील आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत,असा दावा आ. धस यांनी केला.
‘योजनेचा आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात’
जायकवाडी प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचा आराखडा आता अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असल्याचेही आमदार धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे या विषयावर आधीच शासनस्तरावर कार्यवाही सुरू असताना केवळ त्याचे राजकीय श्रेय घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
‘श्रेय घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन’
माजी आमदारांना शासनस्तरावर सुरू असलेल्या या प्रक्रियेची माहिती असूनही दुष्काळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचा दावा करत आ.धस म्हणाले की,शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्याऐवजी प्रत्यक्ष उपाययोजनांसाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. जनतेची दिशाभूल करून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले.
‘कडा साखर कारखाना व शिक्षण संस्था सांभाळा’
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर टीका करताना आ. सुरेश धस यांनी त्यांना त्यांच्या कडा सहकारी साखर कारखान्याकडे आणि शिक्षण संस्थांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विनाकारण आंदोलने करण्यापेक्षा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात, असेही धस यांनी म्हटले.
‘महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरू नका’
दरम्यान, शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष सुरेश उगलमुगले यांनीही या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडली. माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या आंदोलनाच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरू नयेत,असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.