दारूच्या नशेत मुलाकडून बापाचा निर्घृण खून;कडा बसस्थानक परिसरातील थरारक घटना
click2ashti–तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने गाढ झोपलेल्या स्वतःच्या बापाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेत अनिल सजन मुळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला असून किरण मुळे (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी गावचे रहिवासी असलेले मुळे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कडा शहरातील बसस्थानक परिसरात मजुरीसाठी झोपड्या टाकून वास्तव्यास होते.सोमवारी पहाटेच्या सुमारास किरण मुळे हा दारूच्या नशेत घरी आला.त्यावेळी अनिल मुळे हे गाढ झोपेत असताना, किरणने संतापाच्या भरात त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले.या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला.या खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर आरोपी किरण मुळे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.दरम्यान,आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तैनात केली असून,परिसरात शोधमोहीम सुरू आहे.या घटनेमुळे कडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.