आजचा माणूस विचारांच्या गोंधळात अडकून खऱ्या अर्थाने जगणेच विसरला-महाजन
“जिंदगी ना मिलेगी दोबारा”तून सकारात्मक जीवनाचा संदेश- यजुर्वेद्र महाजन यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
click2ashti-“मानवजन्म हा अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल आहे.आपल्याला प्राणी नाही,तर माणूस म्हणून जन्म मिळाला हे आपले मोठे भाग्य आहे.मात्र आजचा माणूस विचारांच्या गोंधळात अडकून खऱ्या अर्थाने जगणेच विसरला आहे,”असे प्रतिपादन दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेद्र महाजन यांनी केले.
आष्टी जैन श्रावक संघाच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त सोमवार (दि. ३०) रोजी रात्री ९ वाजता आनंदऋषी महाराज चौक येथे “जिंदगी ना मिलेगी दोबारा” या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,सुखलाल मुथ्था, नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,आदिनाथ सानप,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,दत्ताभाऊ काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाजन पुढे म्हणाले,“आजचा माणूस पैशाच्या मागे धावताना स्वतःसाठी वेळ देत नाही.आनंद बाहेर शोधण्याऐवजी आपल्या आत शोधला पाहिजे. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने केली तर आयुष्य अधिक सुंदर बनते. आपण इतरांना दोष देण्यात वेळ घालवतो,पण स्वतःमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करत नाही.”“माणसांनी जगताना तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात-स्वतःवर प्रेम करा, इतरांना मदत करा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा.जीवनात किती दिवस जगलो हे महत्त्वाचे नसून, कसे जगलो हे अधिक महत्त्वाचे आहे,” असा संदेश त्यांनी दिला.तसेच त्यांनी समाजातील वाढत्या मानसिक ताणतणावावर भाष्य करताना सांगितले की,“आज प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक व्यक्ती मानसिक समस्यांना सामोरे जात आहे. त्यामुळे संवाद, सहकार्य आणि सकारात्मक विचार यांची गरज अधिक आहे.”आमदार सुरेश धस म्हणाले,जैन श्रावक संघाच्या माध्यमातून आज आष्टीच्या पवित्र मातीत दिपस्तंभ संस्थेचे सर्वेसर्वा यजुर्वेद्र महाजन यांचे आगमन झाले,ही बाब आष्टीकरांसाठी खरोखरच एक पर्वणी ठरली आहे.समाजातील अनेक अशा व्यक्ती-अनाथ मुले,अपंग,तृतीयपंथी तसेच कुटुंबीयांनी नाकारलेले, उपेक्षित जीवन जगणारे लोक-ज्यांना स्वतःच्या घरच्यांकडूनही आधार मिळत नाही, अशा घटकांना यजुर्वेद्र महाजन यांनी दिपस्तंभाच्या माध्यमातून मायेचा हात दिला आहे.ते केवळ आश्रय देत नाहीत.

तर या वंचित घटकांना शिक्षण,संस्कार,आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने जगण्याची दिशा देण्याचे महान कार्य करत आहेत.त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन बदलले असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. यजुर्वेद्र महाजन यांचे कार्य इतके व्यापक आणि हृदयस्पर्शी आहे की,ते थोडक्यात समजून घेणे अशक्य आहे.त्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागतो आणि त्यांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो.अशा समाजसेवकांची आज समाजाला नितांत गरज असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा,असेही त्यांनी यावेळी सांगितले.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बोगावत यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी करुन मानले.
महावीर रत्न पुरस्कार अनंत हंबर्डे यांना प्रदान
आष्टी जैन श्रावक संघाच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा ‘महावीर रत्न’ पुरस्कार यंदा जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांना प्रदान करण्यात आला. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.