आष्टी तालुका पत्रकार संघाची शिराळ येथे आजबे कुटुंबियांसाठी आधाराची भेट
click2ashti–बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत राहून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे विलास आबा आजबे यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्याने आजबे कुटुंबासह संपूर्ण आष्टी तालुक्यावर दुःखाची छाया पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार (दि.१९)रोजी आष्टी तालुका पत्रकार संघाने शिराळ येथील आजबे कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत,या कठीण प्रसंगी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत,असा विश्वास पत्रकारांनी दिला.विलास आबा आजबे यांनी सहकार क्षेत्रात काम करताना प्रामाणिकपणा आणि लोकसंपर्काच्या बळावर आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना सर्व स्तरातून मान्यता मिळाली होती. त्यांच्या अचानक निधनाने अनेकांना धक्का बसला असून, त्यांच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी काढली.
या भेटीदरम्यान पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप यांच्यासह भीमराव गुरव,शरद तळेकर,शरद रेडेकर,गणेश दळवी,मनोज पोकळे ,सचिन रानडे यांनी माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची भेट घेतली.सर्वांनी विलास आबा यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या प्रसंगी शिराळ ग्रामस्थ व इतर मान्यवरही उपस्थित होते. विलास आबा आजबे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.