ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी ५०० पर्यंत वाढवण्यासाठी जनजागृतीची गरज-आ. सुरेश धस
आष्टी ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ
click2ashti–आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध असून उपचाराचा दर्जाही चांगला आहे.या सुविधांची व्यापक जनजागृती करून रुग्णालयातील ओपीडी संख्या दररोज ५०० च्या आसपास नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.
आष्टी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर,सोनोग्राफी मशीन यांचा शुभारंभ तसेच पाच लाख लिटर क्षमतेच्या पाणीसाठा तलावाचे लोकार्पण शनिवार (दि.२५)रोजी सकाळी ११ वाजता आमदार धस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतिष सोळंके,वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मोराळे,विकास कदम,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, जालिंदर पोकळे,नगराध्यक्ष जिया बेग,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी,भाजपा विधानसभा अध्यक्ष गणेश शिंदे, बद्रीनाथ जगताप,रमेश गावडे,आदिनाथ सानप आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,आष्टी ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर रुग्णालयात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो.काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयातील ओपीडी संख्या शून्यावर गेली होती.मात्र,सध्या ती वाढून २०० ते २५० पर्यंत पोहोचली आहे.आगामी काळात ती ५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिष सोळंके यांनी सांगितले की,रुग्णालयातील कोणतेही प्रशासकीय काम प्रलंबित राहणार नाही.आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.प्रास्ताविकात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे यांनी सांगितले की, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची कोणतीही हेळसांड होऊ दिली जाणार नाही.आमदार धस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध झाल्या असून रुग्णांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे.दरम्यान,या रुग्णालयात आता हार्निया,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,मुळव्याध यांसारख्या उपचार सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.