व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शृंगेरी देवी मंदिरात पुन्हा धाडसी चोरी;CCTV वायर कापून चोरट्यांचा डाव-पोलिसांच्या भूमिकेवर संताप

वारंवार चोरी, तरीही तपास ठप्प?

0

click2ashti-तालुक्यातील ब्रह्ह्मगाव येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या शृंगेरी देवी मंदिरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने धाडसी चोरी करत सुरक्षेची पोलखोल केली.चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे वायर कापून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि देवीचे चांदीचे दोन टोप तसेच काही दागिने लंपास केले.या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे,मंदिराच्या कार्यालयासमोरील कॅमेऱ्यात एक संशयास्पद हालचाल कैद झाली असून,त्यावरून चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
दरम्यान,या प्रकरणात आष्टी पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरत आहे.चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंची खरेदी पावती उपलब्ध नसल्याचे कारण देत पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय हराळ यांनी केला आहे. भाविकांकडून भेट स्वरूपात मिळणाऱ्या दागिन्यांना पावत्या असणे शक्य नसतानाही पोलिसांनी तांत्रिक कारण पुढे करत तक्रार घेण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शृंगेरी देवी मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे दररोज मोठी वर्दळ असते.मात्र,या मंदिरात चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही.सुमारे दीड वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे चांदीचे टोप चोरीला गेले होते.वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंदिराच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
वारंवार चोरी, तरीही तपास ठप्प?
गेल्या काही वर्षांपासून दर वर्षा-दिड वर्षांनी मंदिरात चोरीचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.मात्र,या प्रकरणांचा ठोस तपास होत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. “गावकऱ्यांचा पाठपुरवठा नाही आणि पोलिसांची तत्परता नाही, त्यामुळे तपास केवळ कागदावरच राहतो,”अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
सुरक्षेची गरज अधोरेखित
या घटनेनंतर मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा,तसेच रात्री गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा,भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान,या चोरीचा लवकरात लवकर छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करावी,तसेच पोलिसांनी तक्रार तात्काळ दाखल करून तपास सुरू करावा,अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.