व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आषाढी वारीवर काळाचा घाला;जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक,तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

0

click2ashti-आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर सोमवारी सकाळी मोठा अनर्थ ओढवला.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना जेजुरीजवळील भोंगळे मळा परिसरात एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून,अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ऊन-पावसाची पर्वा न करता पायी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथील मुक्काम आटोपून सोमवारी सकाळी जेजुरीकडे मार्गस्थ झाली होती. यावेळी पालखी मार्गावर वारकऱ्यांची मोठी गर्दी होती. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक एकाच बाजूने सुरू ठेवण्यात आली होती.
प्राथमिक माहितीनुसार,जेजुरीजवळील भोंगळे मळा येथे मागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने प्रथम वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिली आणि त्यानंतर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना चिरडले.या भीषण धडकेत सहा वारकरी गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक,स्वयंसेवक आणि इतर वारकरी मदतीसाठी धावले.जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचारादरम्यान तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमी वारकऱ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.या दुर्दैवी घटनेमुळे वारीत शोककळा पसरली असून वारकरी, भाविक आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.