वाढदिवसाचा अनोखा आदर्श ! मुलाचा वाढदिवस अनाथ बालकांसोबत साजरा;शालेय साहित्य व गोड जेवणाचे वाटप
आष्टीच्या व्यापारी प्रितम बोगावत यांचा सामाजिक उपक्रम; जामखेड येथील निवारा बालगृहातील ८० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य
click2ashti-आजच्या आधुनिक काळात वाढदिवस म्हणजे महागडी हॉटेल्स,आकर्षक डेकोरेशन,मोठमोठे केक आणि दिमाखदार सेलिब्रेशन,अशीच सर्वसाधारण धारणा झाली आहे.मात्र समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपत आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आष्टी येथील व्यापारी प्रितम बोगावत यांनी आपल्या स्मित या मुलाचा वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करून समाजासमोर अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून वाढदिवसाच्या या अनोख्या सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा रंगली आहे.
शनिवार (दि. १८) रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह, जामखेड येथे आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बोगावत परिवाराने भेट देत तेथील विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण वाटले. यावेळी बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच सर्व मुलांना गोड जेवण देऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
जामखेड येथील या निवारा बालगृहात भटक्या-विमुक्त समाजातील अनाथ मुले,ऊसतोड कामगार मुले,विटभट्टी मजुराची मुलं तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेणारी सुमारे ८० मुले वास्तव्यास आहेत.अशा विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून बोगावत परिवाराने केवळ आनंदच वाटला नाही, तर सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही समाजासमोर अधोरेखित केली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण जाधव,विजय बोगावत,वैजीनाथ केसकर,संतोष चव्हाण,मुर्शदपूर ग्रामपंचायत सदस्य अक्षय हळपावत, श्रवण पांडे,तसेच प्रितम बोगावत यांच्यासह बोगावत परिवारातील सदस्य उपस्थित होते.वाढदिवस हा केवळ उत्सव न राहता समाजातील गरजू आणि वंचित मुलांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करण्याचे माध्यम ठरू शकतो,याची प्रचिती प्रितम बोगावत यांच्या या उपक्रमातून आली. त्यांच्या या सामाजिक जाणिवेच्या कृतीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, इतरांनीही अशा उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.