व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

व्हे पावडर प्रकरणात आष्टीतील दिलीप हंबर्डेला रात्री अटक

भेसळयुक्त दूध निर्मितीसाठी अवैध वाहतूक; अटकेतील आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांची कारवाई

0

click2ashti-भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरची अवैध वाहतूक व विक्रीप्रकरणी आष्टी पोलिसांनी यापूर्वी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात आष्टी येथील दिलीप जानदेव हंबर्डे याचे नाव समोर आल्यानंतर आष्टी पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली.या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आष्टी-जामगाव रोडवरील नक्षत्र लॉन्ससमोर भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून MH-13 CU-4141 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली.वाहनामध्ये २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या व्हे पावडर आढळून आल्या.वाहनचालकाची चौकशी केली असता,त्याने आष्टी शहरातील एका ठिकाणी यापूर्वीच २५ गोण्यांचा पुरवठा केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून आणखी २५ गोण्या जप्त केल्या. या कारवाईत एकूण ७२ गोण्या व्हे पावडर, अंदाजे २ लाख ६९ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल,पोलिसांनी ताब्यात घेतला.या प्रकरणी बीड येथील अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान,अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दिलीप जानदेव हंबर्डे याचे नाव घेतल्याचे समोर आले आहे.हंबर्डे यांच्या सांगण्यावरूनच व्हे पावडरच्या पुरवठ्याचे काम सुरू असल्याचा जबाब आरोपीने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हंबर्डे याला रात्री अटक केली.व्हे पावडरचा नेमका वापर कुठे आणि कोणाकडून केला जात होता, या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का,तसेच भेसळयुक्त दूध तयार करून ते बाजारात वितरित केले जात होते का,याचा तपास आष्टी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.