व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धसांचे गोरगरीब भगिनींसोबत,तर धोंडेंचे नोकरदार बहिणींसोबत रक्षाबंधन..!

आष्टीत आजी-माजी आमदारांच्या‘रक्षाबंधना’ची रंगली चर्चा;दोघांची शैली वेगळी,मात्र बहिणींच्या प्रेमाचा धागा एकच

0

गणेश दळवी आष्टी-रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त आष्टीच्या राजकारणातील आजी-माजी आमदारांच्या रक्षाबंधन सोहळ्याची यंदाही चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गोरगरीब, वंचित आणि भटक्या-विमुक्त समाजातील भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नोकरदार महिलांसोबत मॉर्निंग वॉकदरम्यान रक्षाबंधनाचा सण साजरा केला. दोन्ही नेत्यांची रक्षाबंधन साजरे करण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यामागील संदेशाची आष्टीत दिवसभर चर्चा सुरू आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही आष्टीतील अद्वैतचंद्र निवासस्थानी गोरगरीब, वंचित तसेच भटक्या-विमुक्त समाजातील असंख्य भगिनींची मोठी उपस्थिती होती.भगिनींनी आमदार सुरेश धस यांच्या मनगटावर राखी बांधत आपुलकीचा धागा घट्ट केला.या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सन्मान म्हणून प्रत्येक भगिनीला साडी-चोळी व फळे देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. त्यामुळे धस यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाला सामाजिक बांधिलकीची किनार पाहायला मिळाली.दुसरीकडे,माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही रक्षाबंधनाची आपली वेगळीच‘स्टाईल’कायम ठेवली.सकाळच्या मॉर्निंग वॉकदरम्यान नोकरदार महिलांसोबत त्यांनी रक्षाबंधन साजरे केले.कामाच्या धावपळीतही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा संदेश देत त्यांनी बहिणींना शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि चालण्याचे महत्त्व सांगितले.त्यामुळे धोंडेंच्या रक्षाबंधनाला सामाजिक जिव्हाळ्यासोबतच ‘फिटनेस’चा संदेशही जोडला गेला.एकीकडे धसांच्या निवासस्थानी गोरगरीब वंचित भगिनींची गर्दी,तर दुसरीकडे धोंडेंच्या मॉर्निंग वॉकमध्ये नोकरदार भगिनींची साथ असे दोन वेगवेगळे चित्र आष्टीकरांना पाहायला मिळाले.त्यामुळे‘रक्षाबंधनाचा धागा एकच; पण सेलिब्रेशनची स्टाईल वेगळी!’अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.आष्टीच्या राजकारणात धस आणि धोंडे हे दोन महत्त्वाचे चेहरे मानले जातात. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोणत्या समाजघटकांशी संवाद साधला, याचीही राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र राजकीय अर्थ लावण्यापेक्षा या दोन्ही कार्यक्रमांतून बहिणींच्या प्रेमाचा आणि सामाजिक जिव्हाळ्याचा धागा अधिक ठळकपणे समोर आला,हे विशेष.रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन नेत्यांचे दोन वेगळे अंदाज पाहायला मिळाल्याने आष्टीच्या राजकीय वर्तुळात आजचा दिवस चांगलाच‘चर्चेचा’ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.