व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

डॉ.महेंद्र पटवांविरोधातील प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू;वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामदास मोराळे यांची माहिती

0

click2ashti-कडा येथील डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या प्रकरणातील १९ वर्षीय पीडित तरुणीची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामदास मोराळे यांनी दिली.
कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टर महेंद्र पटवा यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ७४, ७५(१) आणि ३५१(२)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर कडा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत ‘पटवा,हटवा’ अशी मागणी करण्यात आली होती. संबंधित व्यक्तीला अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पदावरून हटवावे,अशी मागणी करत कडा शहर बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर संस्थेच्या कार्यकारी मंडळाने डॉ.महेंद्र पटवा यांना मानद मंत्री पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून,पीडित तरुणीच्या प्रकृतीकडे तिच्या कुटुंबीयांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतली जाते,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीडितेची प्रकृती बिघडल्याने चिंता वाढली
या सर्व घडामोडींमध्ये आता पीडित तरुणीची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. सध्या आष्टी ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून, वैद्यकीय पथक तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.“पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत,”अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामदास मोराळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.