तीन महिन्यांची सरकारला मुदत;दगाफटका झाल्यास थेट मुंबईत आंदोलनाचा इशारा
click2ashti- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण स्थगित केले.मात्र,आंदोलन संपले नसून सरकारला सातारा व कोल्हापूर गॅझेटसाठी तीन महिन्यांची मुदत देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या काळात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण न करता थेट मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,दादा भुसे,आमदार प्रसाद लाड व आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. चर्चेनंतर पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ५८ लाख नोंदी रद्द होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याचे सांगितले.तसेच हैदराबाद गॅझेटच्या जीआरमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
“सरकारला समाजापुढे वाकायला लावले.आता तीन महिन्यांची शेवटची संधी देत आहोत.दगाफटका झाल्यास थेट मुंबईवर धडकणार,”असा इशारा जरांगे यांनी दिला.मुंबईत गेलेल्या तरुणांनी गणपतीचे दर्शन घेऊन माघारी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान,सरकारच्या शिष्टमंडळाने यापुढे जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.