डीजेवरील बंदीचा निषेध;आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेचा काळ्या फितीने गणपती विसर्जन सोहळा
काळे कपडे,तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून प्रशासनाचा निषेध; ‘डीजेला परवानगी द्या’अशी मागणी
click2ashti-गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आल्याच्या निषेधार्थ आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला.संघटनेच्या सदस्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांसह विविध वाद्यांचा वापर केला जातो. मात्र, यंदा डीजे वाजविण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आल्याने फोटोग्राफर संघटनेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सदस्यांनी ‘आवाज 0 dB… भावना 100%’,‘ZERO DECIBEL’,‘SILENT VISARJAN’,‘MUTE MIRAVNUK’ अशा आशयाचे फलक हातात घेतले.काळे कपडे आणि तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून संघटनेने आपला निषेध नोंदविला. त्यानंतर गणरायाच्या प्रतिमेसह विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत गणपती विसर्जन केले.प्रशासनाने गणेशोत्सवातील पारंपरिक उत्साह आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन डीजेवरील निर्बंधांबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका संघटनेच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. या अनोख्या निषेधामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.
‘आवाज कमी, भावना मात्र शंभर टक्के!’
हातातील फलकांवरून फोटोग्राफर संघटनेने शांततेचा संदेश देतानाच डीजेवरील बंदीबाबत आपली नाराजीही व्यक्त केली.काळ्या वेशातील आणि तोंडाला काळ्या पट्ट्या बांधलेल्या सदस्यांचा सहभाग हा विसर्जन मिरवणुकीतील चर्चेचा विषय ठरला.