व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन केली पाहणी;शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

0

click2ashti-आष्टी तालुक्यात अल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान तसेच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न याची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आष्टी तालुक्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागात पिकांवर संकट ओढवले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शुक्रवार (दि.२५) रोजी आष्टी तालुक्याचा दौरा करून चिचपूर,आष्टी शिवारा तसेच पोहरी व पांढरी परिसरातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. चिचपूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच चिचपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही भेट देऊन पाहणी करण्यात आली.त्यानंतर आष्टी शिवारा परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. पोहरी परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करताना शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. पांढरी येथेही शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यात आली.यानंतर आष्टी तहसील कार्यालयात आमदार सुरेश धस यांच्यासोबत दुष्काळसदृश परिस्थिती तसेच जनावरांच्या चारापाणी व चारा डेपो या विषयांवर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी व पशुपालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.
ई-पिक पाहणीबाबत सक्त सूचना
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आष्टी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी तसेच मंडळ अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.यावेळी ई-पिक पाहणीचे काम शासनाच्या निर्देशानुसार वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या पिकांची वस्तुनिष्ठ नोंद होणे आणि नुकसानीची योग्य प्रकारे नोंदणी होणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तसेच ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालय सुरू करून कामकाज करण्याबाबतही सक्त सूचना देण्यात आल्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व ग्रामस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
डोंगरगण व डोंगरवाडी कार्यालयांचीही पाहणी
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी मंडळ अधिकारी विभाग डोंगरगण तसेच ग्राम महसूल अधिकारी कार्यालय डोंगरगण यांच्या कार्यालयांची पाहणी केली. कार्यालयीन कामकाज, उपलब्ध सुविधा तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला.
या पाहणी दौऱ्यावेळी श्रीमती वसिमा शेख,उपविभागीय अधिकारी पाटोदा,श्रीमती वैशाली पाटील,तहसीलदार आष्टी,नायब तहसीलदार श्री. पांडुरंग माढेकर,नायब तहसीलदार (निवडणूक) श्री. प्रकाश शिरसवाड, पशुधन विकास अधिकारी यांच्यासह महसूल व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे तालुक्यातील पिकांचे नुकसान, दुष्काळसदृश परिस्थिती आणि पशुधनाच्या चारा-पाण्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, पुढील काळात शासनस्तरावर कोणत्या उपाययोजना होतात याकडे शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दूध व्यवसायामुळे चारा प्रश्न गंभीर
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पांढरी येथील शेतकरी सरपंच यांच्याकडून मुक्त जनावरांच्या गोठ्यांची व जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते,याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गोठ्यावर भेट देऊन पाहणीही केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.