अनुदान मिळण्यासाठी ई पीक नोंदणी ही अट शिथील करुन अर्ज स्विकारण्यास मुदत वाढ मिळावी-माजी आमदार भीमराव धोंडे
अष्टी-कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ई पीक नोंदणी ही अट शिथील करुन शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यास मुदत वाढवून मिळावी अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातील घसरण पाहाता त्यावर उपाय योजना म्हणून शासनाने प्रती क्वींटल रुपये ३५० रुपये याप्रमाणे २०० क्वींटल पर्यंत प्रती शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु यासाठी शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ईपीक पाहणी करताना बऱ्याचवेळेस सर्वर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना खुपच अडचणी आल्याने ७/१२ वर कांदा पीकाच्या नोंदी झाल्या नाहीत. याच कारणामुळे मोठया प्रमाणावर शेतकरी कांदा अनुदानापासुन वंचीत राहण्याची शक्यता असल्याने ईपीक पाहणी ही अट शिथील करून शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या कांदा विक्री पावतीच्या आधारेच अनुदान देण्यात यावे जेणेकरुन एकही शेतकरी अनुदानापासून वंचीत राहणार नाही, तसेच शेतकऱ्याकडुन बाजार समितीकडे अनुदानासाठी अर्ज देण्याची मुदतही वाढवून देऊन सहकार्य करावे असेही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी निवेदनादत म्हटले आहे.