गुजरात वृत्तसेवा-निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत.182 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. हिमाचल विधानसभा निवडणुकीसोबत 8 डिसेंबरला निकाल लागणार आहेत.
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी गुजरातमध्ये 4.6 लाख लोक प्रथमच मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना सीईसी राजीव कुमार यांनी सांगितले की,गीर जंगलातील बज गावात राहणारे भरतदास दर्शनदास यांच्यासाठी एक मतदान केंद्र बनवले जाईल. या एकाच मतदाराकडून 15 जणांचे पथक मतदान करून घेण्यासाठी जाणार आहे.ते म्हणाले-भरतदास आपल्या गावाबाहेर पडून मतदान करू इच्छित नाही, म्हणून त्यांच्यासाठी मतदान केंद्र आणि मतदान पथक पाठवले जाईल.
भाजपचे 160 जागा जिंकण्याचे लक्ष्य
————————————————
यावेळी भाजपने 182 जागांपैकी 160 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा गुरुवारी गांधीनगरला पोहोचणार आहेत.भाजपला आतापर्यंत 4,340 जणांची नावे मिळाली आहेत.सर्वाधिक 1,490 उत्तर गुजरातमधील आहेत.सौराष्ट्रमध्ये 1,163, मध्य गुजरातमध्ये 962 आणि दक्षिण गुजरातमध्ये सर्वात कमी 725 आहेत.
निवडणुकीच्या तारखांना विलंब झाल्याचा आरोप
————————————————————
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास उशीर होण्याचे ठोस कारण निवडणूक आयोगाने अद्याप दिलेले नाही.याआधी हिमाचलच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करायच्या होत्या, पण तसे झाले नाही.गेल्या वेळी (2017) बनासकांठामध्ये आलेला पूर हे विलंबाचे कारण होते.मात्र,तरीही निवडणुकीच्या तारखा 25 ऑक्टोबरला जाहीर झाल्या. दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.