व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

२२ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यात मोफत तपासणी व उपचार; नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा-आ.सुरेश धस

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ

0

click2ashti-वाढत्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच बदलत्या आहार-विहारामुळे विविध आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.अनेक नागरिक आर्थिक अडचणी किंवा वेळेअभावी उपचारांपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधी,धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जिल्हा प्रशासन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ बुधवारी (दि. २२) आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीसकुमार साळ्खे,सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शिवशंकर वलांडे,डॉ.संदीप गाडे,उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, तहसीलदार वैशाली पाटील,तहसीलदार दत्तात्रय निलावाड,नगराध्यक्ष जिया बेग,सभापती रमजान तांबोळी,माजी सभापती बद्रीनाथ जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. काहीजण आर्थिक परिस्थितीमुळे तर काहीजण कामाच्या व्यापामुळे वेळ काढू शकत नाहीत. परिणामी अनेक गंभीर आजार वेळेत निदान होत नसल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत तपासणी व उपचारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर २२ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या महाआरोग्य शिबिरामध्ये उच्च रक्तदाब (बीपी),मधुमेह (शुगर), हृदयविकार,रक्तवाहिन्यांतील अडथळे (अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी),हाडांचे आजार,सांधेदुखी,गुडघेदुखी,कॅल्शियम व जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे त्रास, मेंदू व आतड्यांचे विकार, तोंडाचा कर्करोग, महिलांमधील गर्भाशय व स्तनाचा कर्करोग, जन्मजात व्यंग असलेल्या बालकांची तपासणी, हिप रिप्लेसमेंट, बॉल जॉइंट प्रत्यारोपण आदी विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी,मार्गदर्शन व आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.गंभीर रुग्णांना पुढील अत्याधुनिक शस्त्रक्रियांसाठी मुंबई व पुणे येथील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या महाआरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना वेळेत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत उपचारांची संधी उपलब्ध होणार असून गंभीर आजारांवर प्रभावी उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिरूर चे तहसिलदार व बीडीओ यांनी शिबीराला मारली दांडी
दरम्यान मतदार संघात एवढ्या मोठ्या महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले असून तिन्ही तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी यांना निमंत्रित केले होते.पण या शिबीराचा शिरुर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी दांडी मारल्याने आ.धस यांनी आपल्या भाषणात यांचा उल्लेख करत गैरहजर राहणे हे गैर असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.