रखडलेल्या आष्टीच्या नव्या एसटी बसस्थानकाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते लोकार्पण
click2ashti-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आष्टी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे प्रातिनिधिक लोकार्पण रविवारी सकाळी आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आले.अनेक दिवस विविध तांत्रिक कारणांमुळे रखडलेले बसस्थानक अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी बोलताना आमदार धस म्हणाले,”एसटीची’लाल परी’ही ग्रामीण भागातील विद्यार्थी,शेतकरी,महिला,कामगार,ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाची जीवनवाहिनी आहे. नवीन बसस्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित,स्वच्छ आणि आधुनिक सुविधा मिळून प्रवास अधिक सुखकर होईल.”तसेच,”थोडे दिवस थांबा…आष्टी आणि मुर्शदपूरचा कायापालट करून दाखवू,”अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शहरातील रस्ते,पाणीपुरवठा,व्यापारी संकुल,शैक्षणिक सुविधा आणि इतर विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर बससेवा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित एसटी पासचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.बसस्थानक परिसरात सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी व्यावसायिक गाळे उभारून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचे वाटप पारदर्शक पद्धतीने केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.या प्रसंगी नगरपंचायत अध्यक्ष जिया बेग,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,भारत मुरकुटे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,आगार व्यवस्थापक अनिल निकाळजे,व्यापारी संघटनेचे संजय मेहेर,भाजपा विधानसभा अध्यक्ष गणेश शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप,गटनेते किशोर झरेकर,जालिंदर पोकळे,शेख शरीफ,प्रविण कदम,अक्षय धोंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.लोकार्पण सोहळ्यास नगरपंचायतीचे पदाधिकारी,मुर्शदपूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व्यापारी,पत्रकार,ज्येष्ठ नागरिक,एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.