१२ वर्षांची प्रतीक्षा संपली ! आष्टीचे नवीन बसस्थानक आज प्रवाशांच्या सेवेत
आ.सुरेश धस यांच्या हस्ते प्रातिनिधिक उद्घाटन;पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय टळणार
click2ashti-गेल्या तब्बल बारा वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या आष्टी येथील नवीन एस.टी. बसस्थानकाची प्रतीक्षा अखेर संपली असून रविवार (दि.२) रोजी सकाळी १० वाजल्यापासून हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे.आमदार सुरेश धस यांच्या हस्ते या बसस्थानकाचे प्रातिनिधिक उद्घाटन होणार असून, ही माहिती आष्टी आगाराचे प्रमुख अनिल निकाळजे यांनी दिली.

आष्टी शहरासह तालुक्यातील हजारो प्रवाशांना अनेक वर्षांपासून नवीन बसस्थानक सुरू होण्याची प्रतीक्षा होती.दरम्यान,पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार सुरेश धस यांनी आठवडाभरापूर्वी एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती.या बैठकीत बसस्थानकाची उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करत तातडीने नवीन बसस्थानक सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते.या निर्देशानंतर प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली असून रविवारपासून नवीन बसस्थानक प्रवाशांच्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना सुरक्षित,स्वच्छ आणि अधिक सोयीस्कर वातावरणात बससेवेचा लाभ घेता येणार आहे.आगार प्रमुख अनिल निकाळजे यांनी सांगितले की, बसस्थानकाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसस्थानक तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान,बसस्थानकातील अंतर्गत काँक्रीटीकरण,संरक्षण भिंतीचे काम,जुन्या बसस्थानकाचे पाडकाम तसेच काही किरकोळ कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन बसस्थानकाचे भव्य उद्घाटन आयोजित करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.आमदार सुरेश धस यांनी नुकतीच बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला होता.त्यानंतर प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देत नवीन बसस्थानक तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी एस.टी. महामंडळाला दिले होते.त्यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने आष्टीकर प्रवासी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नवीन बसस्थानक सुरू झाल्यामुळे आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा मिळणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही यामुळे नवे बळ मिळणार आहे.