श्रमदानातून स्वच्छता,वृक्षारोपण व शहर सुशोभीकरणाचा संकल्प; आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ-नगराध्यक्ष
आष्टीच्या विकासासाठी नागरिक देणार‘एक तास’
click2ashti-शहर स्वच्छ,सुंदर,हिरवेगार आणि विकसित करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. याच उद्देशाने ‘चला… श्रमदानासाठी एक तास देऊया!’ या संकल्पनेतून आष्टी शहरात श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ६ वाजता पिंपळेश्वर मंदिर परिसरात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली आहे.
शहराच्या विकासाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे.नागरिकांनी आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनातून केवळ एक तास शहरासाठी दिल्यास सामूहिक श्रमदानातून शहराच्या स्वच्छता व सुशोभीकरणाला मोठी चालना मिळू शकते.या भावनेतून ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.या श्रमदान मोहिमेत वृक्षारोपण,स्वच्छता तसेच शहराच्या सुशोभीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या हातांनी श्रमदान करावे आणि शहराच्या विकासात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
‘एक तास आपल्यासाठी, एक तास आपल्या शहरासाठी’ या संकल्पनेतून नागरिकांनी एकत्र येत आष्टी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष जिया बेग आणि माजी नगराध्यक्ष रंगनाथ धुंडे यांनी केले आहे.या मोहिमेत शहरातील नागरिक,युवक,सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.