३७ वर्षांनंतर हिराबाईंच्या आयुष्यात परतला‘उजवा हात’!
आष्टीतील महाआरोग्य शिबिरातून मिळाली अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हाताची सुविधा;एका हाताने जगलेल्या आयुष्याला मिळाली नव्या आत्मविश्वासाची साथ
गणेश दळवी | आष्टी-वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी झालेल्या दुर्दैवी अपघातात उजवा हात गमावलेल्या ४७ वर्षीय हिराबाई हरिभाऊ गायकवाड यांच्या आयुष्यात तब्बल ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले आहेत.आष्टी येथे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून हिराबाई यांना अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात मिळाला असून,त्यांच्या आयुष्याला जणू नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
हिराबाई गायकवाड सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहेत. लहानपणी झालेल्या अपघातामुळे त्यांचा उजवा हात निकामी झाला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षे त्यांनी एका हाताच्या आधारावर दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जात आपला संसार आणि जीवनाचा गाडा पुढे नेला.मात्र,उजवा हात नसल्याची उणीव त्यांच्या दैनंदिन कामकाजात कायम जाणवत होती.दरम्यान,आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराची माहिती माजी नगरसेवक तथा आमदार सुरेश धस यांचे सहकारी कार्यकर्ते दीपक भाऊ निकाळजे यांनी हिराबाई गायकवाड यांना दिली. केवळ माहिती देऊन न थांबता त्यांनी हिराबाई यांना येण्या-जाण्याच्या खर्चासह आष्टी येथे शिबिरासाठी आणले. यामुळे हिराबाई यांच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली.
शिबिरातील तपासणीतून पुढील उपचारांचा मार्ग मोकळा
महाआरोग्य शिबिरात हिराबाई यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांच्या परिस्थितीचा आणि गरजेचा विचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे पाठविण्यात आले. तेथे आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हिराबाई यांना अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसविण्यात आला.विशेष म्हणजे हा कृत्रिम हात केवळ दिसण्यासाठी नसून दैनंदिन कामकाजात उपयोगी ठरणारा आहे.त्यामुळे हिराबाई यांना आता दोन्ही हातांचा वापर करून विविध कामे करता येत आहेत.अनेक वर्षांपासून एका हाताने काम करण्याची सवय झालेल्या हिराबाई यांच्यासाठी ही सुविधा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घटना ठरली आहे.
“माझ्या उजव्या हाताला पुन्हा ताकद मिळाली…”
आपला अनुभव व्यक्त करताना हिराबाई गायकवाड भावुक झाल्या. त्या म्हणाल्या,“माझ्या उजव्या हाताला पुन्हा ताकद मिळाली. दहा वर्षांची असताना झालेल्या अपघातात माझा उजवा हात निकामी झाला होता. अनेक वर्षे मी एका हातानेच काम करत होते. आष्टीतील महाआरोग्य शिबिरामुळे माझ्यावर उपचाराची संधी मिळाली आणि आज मला इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात मिळाला आहे.आता मी डाव्या हाताप्रमाणेच उजव्या हातानेही काम करू शकत आहे.माझ्या आयुष्यात पुन्हा आत्मविश्वास आणि आनंद आणल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,आमदार सुरेश आण्णा धस साहेब आणि दीपक भाऊ निकाळजे यांचे मनःपूर्वक आभार”
हिराबाई यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेला आत्मविश्वास आणि त्यांच्या अनुभवातून व्यक्त झालेला आनंद हा महाआरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.
महाआरोग्य शिबिर ठरले ‘नव्या आयुष्याची उमेद’ देणारे
महाआरोग्य शिबिराचा उद्देश केवळ रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून थांबणे नसून,गरजू रुग्णांना त्यांच्या आजारावर अथवा शारीरिक अडचणीवर आवश्यक पुढील उपचार मिळवून देणे हा असल्याचे हिराबाई गायकवाड यांच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.
एका अपघातामुळे वयाच्या दहाव्या वर्षी गमावलेला हात, त्यानंतरची तब्बल ३७ वर्षांची प्रतीक्षा आणि अखेर महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मिळालेला अत्याधुनिक कृत्रिम हात—हा हिराबाई यांच्या जीवनप्रवासातील भावनिक आणि प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.
आज हिराबाई पुन्हा दोन्ही हातांनी काम करू शकत आहेत. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यासोबतच त्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.आरोग्यसेवेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला केवळ उपचार नव्हे,तर पुन्हा जगण्याची उमेद मिळू शकते,याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
“महाआरोग्य शिबिरातून उपचारच नव्हे,तर नव्या आयुष्याची उमेद मिळाली,”अशी भावना हिराबाई गायकवाड यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून व्यक्त होत आहे.त्यामुळे आष्टीतील महाआरोग्य शिबिर हे हिराबाई यांच्या आयुष्यातील केवळ वैद्यकीय मदतीचे माध्यम न राहता,३७ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात‘उजवा हात’परत आणणारे आणि नव्या आत्मविश्वासाची पहाट घडविणारे महत्त्वाचे पर्व ठरले आहे.