व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शासकीय धान्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासन सतर्क;निकृष्ट धान्याचे वितरण होऊ देणार नाही-पुरवठा विभागाचा खुलासा

0

click2ashti-“जनावरेही खाणार नाही असे धान्य आम्हाला का?”या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आष्टी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने खुलासा प्रसिद्ध करत शासकीय धान्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार,आष्टी व कडा येथील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आलेल्या धान्याची तसेच रास्त धान्य दुकानांमार्फत वितरित होणाऱ्या धान्याची गुणवत्ता व दर्जा याची नियमित तपासणी केली जाते.तसेच संबंधित गोदाम व्यवस्थापक किंवा रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.भारतीय खाद्य निगम (FCI) मार्फत गुणवत्तेची तपासणी झाल्यानंतरच धान्य शासकीय गोदामात पाठविण्यात येते.त्यामुळे लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य उपलब्ध करून देण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय आष्टी व कडा येथील शासकीय गोदाम व्यवस्थापक तसेच तालुक्यातील सर्व रास्त धान्य दुकानदारांना धान्याची गुणवत्ता तपासूनच गोदामातून उचल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.धान्याचे वितरण करण्यापूर्वी दुकानदारांनीही स्वतःखातरजमा करूनच लाभार्थ्यांना धान्य वाटप करावे,तसेच कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश देण्यात आले आहेत.सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल,असे कोणतेही कृत्य प्रशासनाकडून होऊ दिले जाणार नाही.जनतेच्या सेवेसाठी प्रशासन सदैव कटिबद्ध असून अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी अश्विनी पडोळे (निस्ताने) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.