व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत संविधानाच्या साक्षीने विवाह; समाजप्रबोधनाचा अनोखा आदर्श घालून देणारा खंडागळे-राजगुरू कुटुंबाचा विवाह सोहळा

0

गणेश दळवी|आष्टी-आजच्या काळात लग्न सोहळे म्हणजे केवळ दिखावा, खर्चाची स्पर्धा आणि अनावश्यक थाटमाट अशी ओळख निर्माण होत असताना, आष्टी तालुक्यातील एका विवाह सोहळ्याने समाजाला नवा विचार आणि नवी दिशा दिली आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील बंधन नसून तो सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा संस्कार असावा,या भावनेतून विवाह सोहळ्याची सुरुवातच भारताच्या संविधानाच्या प्रतींचे वाटप करून करण्यात आल्याने हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार,महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व समतेचे कार्य आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानातील हक्क,अधिकार व कर्तव्ये या सर्व विचारधारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, समाजाला संविधानाची खरी ओळख व्हावी,या उद्देशाने हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आष्टी तालुक्यातील शेरी येथील अंबिका लॉन्स येथील कार्यालयात रविवारी(दि.८)मोठ्या उत्साहात आणि साधेपणाने हा विवाह पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांचे चिरंजीव ऋषीकेश खंडागळे आणि संजय भाऊसाहेब राजगुरू (पाटेवाडी,ता.कर्जत) यांची कन्या अनुराधा राजगुरू यांचा विवाह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च टाळून सजावट व इतर बाबींमध्ये साधेपणा राखण्यात आला.मात्र समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा वैचारिक उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले. विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर,पाहुणे व नातेवाईकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भारताचे संविधान’या पुस्तकाची ५०० प्रत भेट स्वरूपात देण्यात आली.विवाह सोहळ्यातून संविधानाचे महत्त्व,त्यातील मूलभूत हक्क,स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव उपस्थितांमध्ये निर्माण झाली.या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे “संविधान वाचावे,समजावे आणि आचरणात आणावे”हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे जाहीर कौतुक करत, समाजप्रबोधनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या विवाह सोहळ्यास आमदार सुरेश धस, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव पोटभरे,भाजपा नेते परमेश्वर यवले,अॅड. साहेबराव म्हस्के,नगराध्यक्ष जिया बेग,मुर्शदपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष चव्हाण,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सानप,पत्रकार प्रविण पोकळे,शरद तळेकर, सचिन रानडे,गणेश दळवी,गणेश शिंदे,आण्णासाहेब चौधरी,अमोल जगताप यांच्यासह विविध सामाजिक,राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.लग्न समारंभात केवळ आनंदोत्सव न साजरा करता समाजहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून संविधानाचा जागर करण्याचा हा प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.खंडागळे व राजगुरू कुटुंबाने दिलेला हा आदर्श इतरांनीही स्वीकारावा,अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली असून,या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.