व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे ऑनलाईन उद्घाटन;न्यायप्रवेश सुलभ होण्यास मोठी चालना

0

click2ashti-येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे स्थापन झाल्याने परिसरातील पक्षकारांना न्यायासाठी बीड येथे वारंवार जावे लागणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशाचा होणारा अपव्यय मोठ्या प्रमाणात टळणार असून न्यायप्रवेश अधिक सुलभ होणार आहे. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे आष्टीने न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण झेप घेतली असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती किशोर संत यांनी केले.
आष्टी येथे जिल्हा बीड अंतर्गत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे ऑनलाईन उद्घाटन शनिवारी (दि. १४) सकाळी ११.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती किशोर संत व न्यायमूर्ती रविंद्र जोशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा न्यायमूर्ती आनंद यावलकर, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल सदस्य वसंत साळुंखे, अहमद खान उस्मान खान,नव्याने नियुक्त दिवाणी न्यायालयाच्या प्रथम न्यायाधीश श्रीमती ए.बी.निवारे यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आष्टी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सय्यद जमाल ताहेर यांनी केले.पालक न्यायमूर्ती किशोर संत यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना सांगितले की, आष्टी न्यायालयाचा इतिहास अत्यंत समृद्ध असून येथील वकीलांनी न्यायालयाची प्रतिष्ठा आणि नाव उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आष्टीतील न्यायालयात केवळ स्थानिक वकीलच नव्हे, तर बाहेरील वकीलांनीही येऊन काम केले आहे. न्यायालयाची स्थापना ही केवळ बार कौन्सिलचे यश नसून त्यामागे न्यायाधीशांचे मार्गदर्शन आणि वकीलांचे सातत्यपूर्ण प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. वकीलांनी आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा जपत न्यायालयाची विश्वासार्हता आणि सन्मान अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.न्यायमूर्ती रविंद्र जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले की, सध्याचे पक्षकार अधिक जागरूक आणि सुजाण झाले असून न्यायदान प्रक्रियेत वकील आणि न्यायाधीश या दोघांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील अनेक न्यायालयांमध्ये वकीलांना बार रूममध्ये बसण्याऐवजी बाहेर पक्षकारांची प्रतीक्षा करावी लागते, ही बाब न्यायव्यवस्थेसाठी चिंताजनक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.जिल्हा न्यायमूर्ती आनंद यावलकर यांनी सांगितले की, नव्याने सुरू होणाऱ्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होणार असून या न्यायालयात कोणत्याही रकमेचे दिवाणी दावे दाखल करता येणार आहेत. बीड येथून एकूण १,३०८ प्रकरणे आष्टी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. या न्यायालयामुळे नागरिकांना न्यायासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांच्या वेळेसह आर्थिक खर्चाचीही बचत होणार आहे.या उद्घाटन समारंभास आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतिष शिंदे यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, अधिकारी,वकील,तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आष्टी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तराचे स्थापन झाल्याने स्थानिक नागरिकांसाठी न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि सुसंघटित होण्यास मदत होणार असून न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.बी.ईनामदार यांनी केले तर आभार न्यायाधीश श्रीमती ए.बी.निवारे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.