माजी आमदार भीमराव धोंडे यांनी फिरवली राजकारणातील भाकरी;महेश कारखान्याची चावी युवकांच्या हाती
डॉ.अजय धोंडे चेअरमन तर दादासाहेब जगताप व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध
गणेश दळवीआष्टी–गेल्या दोन दशकांपासून बंद पडलेल्या कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला आता वेग आला असून, येत्या गळीत हंगामात कारखान्याच्या चिमणीतून पुन्हा धूर निघणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. कारखान्याच्या दुरुस्तीपासून यंत्रसामग्री उभारणीपर्यंतची कामे युद्धपातळीवर सुरू असतानाच नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आज शनिवार (दि.९) रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड मोठ्या उत्साहात पार पडली.राजकारणातील अनुभवाचा वापर करत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पुन्हा एकदा“भाकरी फिरवत” कारखान्याची धुरा युवकांच्या हातात दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते डॉ.अजय धोंडे यांची चेअरमनपदी तर सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले तरुण कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली.
सदरील निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर (प्रादेशिक उपसंचालक, साखर, छत्रपती संभाजीनगर) तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळकृष्ण शिंदे (सहायक निबंधक, अहिल्यानगर) यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततापूर्ण वातावरणात पार पडली.निवडीनंतर कारखाना परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत नव्या नेतृत्वाचे स्वागत केले.नवनिर्वाचित चेअरमन डॉ. अजय धोंडे आणि व्हाईस चेअरमन दादासाहेब जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कारखाना पुन्हा शेतकऱ्यांचा आधारवड बनेल,अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले,“महेश सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना आहे.अनेक वर्षांच्या अडचणींनंतर आता कारखाना नव्या जोमाने उभा राहत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित, कारखान्याची आर्थिक घडी मजबूत करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट राहील.नवीन संचालक मंडळ तरुण असून त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे.सर्वांनी एकजुटीने काम केल्यास कारखाना राज्यात आदर्श ठरेल,”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचित चेअरमन डॉ.अजय धोंडे यांनीही सभासद,संचालक मंडळ व कार्यकर्त्यांचे आभार मानत,“माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.शेतकरी,कामगार आणि सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करू. सर्वांना सोबत घेऊन कारखान्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न राहील,”असे सांगितले.
दरम्यान,सर्वसामान्य कार्यकर्त्याला थेट व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून,भीमराव धोंडे यांनी पुन्हा एकदा तरुणांना संधी देत राजकीय समीकरणात नवा संदेश दिल्याची चर्चा कारखाना परिसरात रंगली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी थोरवे यांनी केले तर आभार नियामत बेग यांनी मानले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे
मा. आ. भीमरावजी धोंडे, नियामत बेग, संभाजी महादेव जगताप, सतीश रभाजी झगडे,अॅड. रत्नदीप भिमराव निकाळजे,गणेश मारुतीराव सांगळे, केशव मच्छिंद्र शिंदे,झुंबर मारुती चव्हाण,बजरंग कोंडीबा कर्डिले,गजानन पांडुरंग गावडे,शहादेव महादेव गर्जे, उद्धव आनंदराव विधाते,अशोक विष्णू खेडकर,तुकाराम रामू मोहोळकर,अंकुश चिंतामण मुंडे,कांती संतोष गोल्हार,उज्वला संजय नन्नवरे,बाबासाहेब गोरख वाघुले,सदाशिव केरू दिंडे असे नवनिर्वाचित संचालक मंडळ आहे.