आषाढी एकादशी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा;गौरगावच्या वारकरी दांपत्याला मानाचा सन्मान
click2ashti-आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शनिवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी परंपरेनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.यंदा या शासकीय महापूजेसाठी धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील ज्येष्ठ वारकरी दांपत्य बाबासाहेब माने(वय ७०)व प्रभावती माने(वय ६८)यांना मानकरी म्हणून पूजेचा सन्मान मिळाला.गेल्या वीस वर्षांपासून अखंड वारीची परंपरा जपणाऱ्या या शेतकरी दांपत्याचा शासनाने गौरव केल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांच्या “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने श्रीक्षेत्र पंढरपूर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.पहाटेच्या शांत आणि मंगल वातावरणात वैदिक मंत्रोच्चार,टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या गजरात शासकीय महापूजा संपन्न झाली.महापूजेपूर्वी रात्री १२.४५ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले.त्यानंतर पहाटे १ ते १.४५ या वेळेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते नित्यपूजा विधिवत पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस मंदिरात दाखल झाले.पहाटे २.२० ते ३ वाजेपर्यंत श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा विधिवत पार पडली.त्यानंतर पहाटे ३ ते ३.३० या वेळेत श्री रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली.संपूर्ण पूजाविधी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक परंपरेनुसार पार पडला.यावेळी मंदिरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.महापूजेदरम्यान श्री विठ्ठलास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्पण केलेला आकर्षक बनारसी सिल्कचा लाल-केशरी रंगाचा पोशाख परिधान करण्यात आला होता. तर श्री रुक्मिणी मातेस लाल-हिरव्या रंगाची सुंदर येवला पैठणी नेसविण्यात आली होती.विठ्ठल-रुक्मिणीची ही देखणी आणि राजेशाही अलंकारसजावट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.यंदाच्या महापूजेला मानकरी म्हणून गौरगावच्या बाबासाहेब माने व प्रभावती माने या वारकरी दांपत्याची निवड करण्यात आली होती.साधेपणा, वारकरी परंपरेप्रती असलेली निष्ठा आणि गेली दोन दशके अखंडपणे पंढरीची वारी करण्याची परंपरा यामुळे या दांपत्याला हा मानाचा सन्मान मिळाला.शासनाच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून स्वागत करण्यात आले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे लाखो वारकरी आणि भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.मंदिर परिसरासह संपूर्ण पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली असून,राज्यभरातून आलेल्या दिंड्या,पालख्या आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे पंढरपूर नगरी भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाने ओसंडून वाहताना दिसत आहे.