व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’शासन-जनतेतील दुवा; पाणंद रस्ते,ऑनलाइन सेवा व घरकुल लाभार्थ्यांना दिलासा-आ.सुरेश धस

आष्टी येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर'उत्साहात;१० हजार प्रमाणपत्रे,१५ हजार सनदांचे वितरण,विविध विभागांच्या योजनांचा एकाच छताखाली लाभ

0

click2ashti-महाराष्ट्र शासनाच्या’छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ माध्यमातून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख झाले असून नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामांना मोठी गती मिळाली आहे.पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत,विविध प्रकारची ऑनलाइन प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध होत आहेत,घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे हे प्रभावी माध्यम ठरले असून नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज कमी झाली आहे,असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच शासकीय कामांना गती मिळावी या उद्देशाने सोमवार,(दि.२७) जुलै २०२६ रोजी आष्टी येथील मंगल कार्यालयात आयोजित’छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात’ ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर,अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपविभागीय अधिकारी वसिमा शेख,तहसीलदार वैशाली पाटील, दत्तात्रय निलावाड,सुरेश घोळवे,गटविकास अधिकारी प्रयाग ढमाळ, संतोष माने,भरत नागरे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, ओमप्रकाश शेळके, अमृत गांगर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.आ.धस पुढे म्हणाले ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.महसूल अभियानामुळे जमिनीच्या मोजणीसह अनेक प्रकरणांचा जलद निपटारा होत असून प्रलंबित कामांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.शासनाने पारदर्शक व जबाबदार प्रशासनावर भर दिला आहे.शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील टाचण गायब झाल्याची घटना गंभीर असून त्याची चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे ७/१२ संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याची गरज व्यक्त केली.आपल्या कार्यकाळात जिल्ह्याला हजारो कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाल्याचे सांगत, सध्याच्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी पुढाकार घ्यावा,असा सल्लाही त्यांनी दिला.
माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी समाधान शिबिर ही अत्यंत चांगली संकल्पना असल्याचे सांगत,या शिबिरांमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी किती तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण झाले याची आकडेवारी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. तसेच प्रत्येक तलाठी व ग्रामसेवक यांनी नियमितपणे सजावर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश प्रशासनाने द्यावेत,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.उपविभागीय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितले की,या शिबिरामध्ये महसूल विभागासह सर्व विभागांचे अधिकारी एकाच छताखाली नागरिकांना सेवा देणार आहेत.या उपक्रमातून सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे तर १५ हजार सनदांचे वितरण करण्यात येणार आहे.ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत,या शिबिरातून शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्ययावत करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत,अशी मागणी केली.तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी कृषी विभागाच्या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविल्या जात असल्याचे सांगितले.आष्टी व पाटोदा तालुक्यातील २,३०० शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी १,५०० शेतकऱ्यांना सुमारे ₹१३ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरूर कासारचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले.प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असे समाधान शिबिर आयोजित करण्यात येत असून त्यामधून नागरिकांच्या छोट्या-मोठ्या महसुली अडचणी तातडीने सोडविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले,तर आभार तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी मानले.शिबिरास मोठ्या संख्येने नागरिक,शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.