अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; ७ पद्मश्री डॉक्टरांसह देशातील नामवंत तज्ज्ञांची उपस्थिती ५० ते ६० हजार रुग्णांच्या तपासणीचे नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टीत भव्य महाआरोग्य शिबिर
click2ashti-आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी,धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जिल्हा प्रशासन,बीड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज,बुधवार (५ ऑगस्ट) रोजी सकाळी आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूलच्या मैदानावर होणार असल्याची माहिती शिबिराचे संयोजक आमदार सुरेश धस यांनी दिली.

या महाआरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी आष्टी नगर पंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार धस बोलत होते.ते म्हणाले की,गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली असून शिबिरासाठी तब्बल ३० हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी २०० स्वतंत्र तपासणी कक्ष तयार करण्यात आले असून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या शिबिरात देशातील सात पद्मश्री डॉक्टरांसह नामवंत अस्थिरोग व मणक्याचे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.पद्मश्री डॉ.शेखर भोजराज, डॉ.मधुसूदन अग्रवाल यांच्यासह अजंठा फार्मा,संजीवनी ममता हॉस्पिटल(मुंबई),साईदीप हॉस्पिटल(अहिल्यानगर),विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय (अहिल्यानगर),वेलनेस हॉस्पिटल(बीड),तसेच केईएम हॉस्पिटल,जे.जे.हॉस्पिटल,ससून रुग्णालय आणि रुबी हॉल क्लिनिक,पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.शिबिरामध्ये गुडघेदुखी,कंबरदुखी,मणक्याचे विकार,मानदुखी, नस दाबली जाणे,सांध्यांचे आजार तसेच हिप रिप्लेसमेंटसारख्या गंभीर अस्थिरोगांवर तपासणी, निदान आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत. विशेषतः ऊसतोड कामगार,हमाल,कांदा उत्पादक शेतकरी तसेच कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना या शिबिराचा मोठा लाभ होणार आहे.उद्घाटन कार्यक्रमास अमृता फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिराला येणाऱ्या प्रत्येक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या संख्येने रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘सर्दी-तापासाठी नव्हे; गंभीर आजारांसाठीच महाआरोग्य शिबिर’
“हे शिबिर सर्दी,ताप किंवा खोकल्यासारख्या किरकोळ आजारांसाठी नसून गंभीर आणि दीर्घकालीन अस्थिरोग व मणक्याच्या विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी आहे. शिबिरात ५० ते ६० हजार रुग्ण येण्याची अपेक्षा असून त्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील वर्षभरात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.उपचारासाठी मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही.संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत असतील,”असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.