“ज्यांच्या खांद्यावर तालुक्याची तहान भागविण्याची जबाबदारी,त्यांच्याच कार्यालयाची तहान टँकरवर!”
पंचायत समिती कार्यालयात खाजगी टँकरने पाणीपुरवठा;ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे विदारक वास्तव पुन्हा समोर
click2ashti-दुष्काळाच्या काळात संपूर्ण तालुक्यातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या आष्टी पंचायत समिती कार्यालयालाच आता खाजगी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. कार्यालयासमोर उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरमुळे तालुक्यातील भीषण पाणीटंचाईची झळ आता सरकारी कार्यालयालाही बसल्याचे स्पष्ट झाले.
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे.अशा परिस्थितीत पंचायत समिती कार्यालयालाही टँकरने पाणी मागवावे लागत असल्याने पाणीटंचाई किती गंभीर आहे, याची प्रचिती येत आहे.”ज्या दारातून गावोगावी टँकरचे आदेश निघतात,त्याच दारात आज टँकर उभा आहे,”अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली.पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावली नसल्याने अनेक पाणीपुरवठा योजनांवर ताण आला आहे.तालुक्यातील नागरिकांनी दीर्घकालीन जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पंचायत समिती कार्यालयातील हे दृश्य सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.याबाबत गटविकास अधिकारी प्रमोद ढमाळ यांच्याशी संपर्क न झाल्याने बाजू कळू शकली नाही.