व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खर्च करायचाच आहे;तर शैक्षणिक सप्ताह सुरू करा…

अखंड हरिनाम सप्ताहात होत असलेल्या पैशाची उधळण चिंतेची बाब

0

आष्टी-गेल्या अनेक वर्षापासून ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.अत्यंत कष्टदायक असलेले हे काम परिस्थितीने ग्रासलेले लोक आजही विनातक्रार करत आहेत.सहा महिने ऊसतोड करण्यासाठी गावची गाव स्थलांतर करत असतात.यामुळे साहजिकच त्यांची पाल्य देखील त्यांच्यासोबत फडावर जातात.याचा विपरीत परिणाम पाल्यांच्या शिक्षणावर होऊन ते देखील भविष्यात हाच मार्ग अवलंबत आले आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.त्यामुळे गावातील शाळा ओस पडत आहेत.कितीही सुविधा विद्यार्थ्यासाठी शासकीय स्तरावर असल्या तरी त्याचा पाल्य नसल्याने किंचितसाही उपयोग होत नाही.त्यामुळे हे लोक आजही प्रवाहात येणार कधी? हा सवाल नेहमी सतावत राहतो.मात्र या लोकांसाठी त्यांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे याचा पुसटसा देखील प्रयत्न इथली यंत्रणा करताना दिसत नाही.शिक्षणाप्रती गोडी निर्माण करणे नाही,की शिक्षणाचे महत्व कोणी यांना सांगत नाही.त्यामुळे आधुनिक युगात देखील हे लोक किती मागास आहेत.याचा अंदाज आल्या शिवाय राहणार नाही.उलट ही लोक आहे त्याच परिस्थितीत कशी राहतील आणि आपण त्यांना कस पिळवून टाकू यावरच अनेक मंडळी आपली पोळी भाजून घेत आहेत.सध्या जिल्ह्यात सप्ताहाचा सपाटाच सुरू आहे.गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह होत आहेत.आणि या सप्ताहाचा खर्च लाखो रुपयात आहे.नारळी सप्ताह तर कोटीत गणला जातो.आणि विशेष म्हणजे देशाची चर्चेतील आणि कर्तव्यनिष्ट असणाऱ्या ईडीच्या यंत्रणेला याची कसलीच माहिती मिळत नाही.कारण या सप्ताहात जमा होणारा निधी हा गोरगरीब जनतेच्या घामातून भावनिकतेच्या गोंडस आधारावर गोळा केला जातो.मात्र हे मोठं मोठे सप्ते घेणाऱ्या आयत्या गादीवर बसलेल्या महान पदवी लावलेल्या महाराजांना कधीतरी आपण उपेक्षित समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एखादा शैक्षणिक सप्ताह आयोजित करावा अशी कल्पना देखील या लोकांना शिवली नाही हे नवलच आहे.
याबाबत सचिन रानडे यांनी सविस्तर मांडलेले वास्तव
अहो ती शिवेलही कशी कारण त्यांना माहीत आहे लोक शिकली की ते सुशिक्षीत होऊन काम धंद्याला लागतील मग आपले भाविक आणि सेवक म्हणून मिरवणारांची संख्या घटली तर आपले वजन कमी होईल.याची ते परिपूर्ण काळजी घेत आहेत.या महाराजांना कधी गावातील शाळा खोल्या दुरुस्त कराव्यात,शिक्षकांशी संवाद साधून शिक्षणाप्रती आपली आस्था दाखवून गावातील मुले शाळेकडे कशी आकर्शिली जातील या साठी काही करता येईल का? हे पाहावे.गावकऱ्यांनी शिक्षणाची पत ढासळणार नाही यासाठी *महाराजांनी कधीतरी गाववाल्यांना धारेवर धरून जाब विचारावा* मात्र असले काम ही महाराज मंडळी मुळीच करणार नाही.उलट गाव आणखी कस आपल्या गादीला मोठं करील आणि परिसरात माझाच मठ कसा मोठा होईल.यावर भर देत अख्ख गाव कामाला लावतात.आणि हो या महाराजांना मुळ पाठबळ देखील राजकारणी मनापासून देतात हे ही विशेष आहे.कारण त्यांना माहित आहे,महाराज आपल्या कामाला येतात आपणही महाराजांच्या कामाला येतोत त्यामुळे यांचं चांगलं साटलोट होत.पण यात सर्वात जास्त भरडला जातो तो सामान्य नागरिक आणि हाच नागरिक आता जागा होण्याची गरज आहे.तुम्ही गाव सप्ताह जरूर करा त्याला मी मुळीच विरोध करणार नाही.परंतु त्या सप्ताहात होणारा अनाठायी खर्च टाळता येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा.अखंड हरिनाम सप्ताहात सात दिवसातील किमान तीन दिवस शैक्षणिक सप्ताहाला द्या.ज्यामुळे गावातील जिल्हा परिषद शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच दरवर्षी गावातील विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी,दैनंदिन उपस्थिती टिकविन्यासाठी,शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी,स्वच्छता,आरोग्य,शिक्षण,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन,मुलींचे लवकर होणारे लग्न टाळण्यासाठी अशा महत्वपूर्ण विषयांवर पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती या सप्ताहाच्या माध्यमातून होईल. जिल्हा परिषद शाळेत विठ्ठल नामाचा शैक्षणिक गजर कानावर पडेल.गावचा विकास हा शिक्षणाच्या पंढरीकडे यशदायी प्रवास सुरू केल्याशिवाय राहणार नाही.आणि तुमच्या याच विज्ञानवादी विचाराला संपूर्ण गाव डोक्यावर घेऊन नाचल्याशिवय राहणार नाही.हे ही तितकेच खर…आणि हो ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा कलंक पुसण्यासाठी हे पुरेस ठरेल !
सचिन रानडे मो.9860273300/8830396300
टिप-यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.मी देखील संस्कृतीचा पाईक आहे.👏🏻👏🏻

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.