“रुग्णांची लुट सहन केली जाणार नाही”;गैरप्रकार करणाऱ्या हॉस्पिटलवर कडक कारवाई करणार-ओमप्रकाश शेटे
आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर
click2ashti-“राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे मिशन म्हणजे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत. त्याच अनुषंगाने मी आज आष्टी येथे आलो असून, बीड जिल्ह्यातील प्रत्येक हॉस्पिटलवर माझे नियंत्रण आहे. कोणत्याही ठिकाणी रुग्णांची लूट अथवा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्यात येईल,”असा स्पष्ट इशारा आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष Omprakash Shete यांनी दिला.
आष्टी येथील पंचायत समिती सभागृहात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या वतीने शुक्रवार (दि.२१) रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी आमदार Suresh Dhas, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम,तहसीलदार वैशाली पाटील,नगराध्यक्ष झिया बेग,दत्ताभाऊ काकडे,डॉ.गायकवाड,जिल्हा समन्वयक डॉ.शिवशंकर गलांडे (RMO), डॉ.वशिम शेख,तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश तांदळे, गटविकास अधिकारी बागलावे साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे,उद्धव सानप,डॉ.राहूल टेकाडे,जिल्हास्तरीय अधिकारी अमित घाडगे यांच्यासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक व विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ओमप्रकाश शेटे म्हणाले की,आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यात अधिक समन्वय आवश्यक आहे.नागरिकांना उपचार घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये,आयुष्यमान कार्डचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे मिळावा यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
“गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने लाखो रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही ठिकाणी रुग्णांना योग्य माहिती मिळत नाही किंवा काही हॉस्पिटल्सकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येतात. अशा प्रकारांना मुळीच थारा दिला जाणार नाही. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने आणि योग्य पद्धतीने उपचार मिळालेच पाहिजेत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीत आयुष्यमान कार्ड नोंदणी, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची माहिती, उपचार प्रक्रियेतील अडचणी, रुग्णालयांची जबाबदारी तसेच आरोग्य योजनांचा अधिकाधिक प्रसार यावर सखोल चर्चा झाली. तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी आमदार सुरेश धस यांनीही आपल्या मनोगतात ओमप्रकाश शेटे यांच्या कार्याचे कौतुक केले.“ओमप्रकाश शेटे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी आरोग्य विभागातून जिल्ह्याला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होत असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे,” असे आमदार धस म्हणाले.आरोग्य योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांपर्यंत उपचार सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून,शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही पात्र नागरिकापासून वंचित राहणार नाही,असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.