व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

समुद्रात वाहून जाणारे पाणी अवर्षणग्रस्त भागाला द्या;माजी आ.धोंडे-आजबे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन

0

click2ashti–बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा आणि शिरूर (का.) तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी व अवर्षणप्रवण पट्टा म्हणून ओळखला जातो.या भागातील जनतेची पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीची तहान भागवण्यासाठी समुद्रात व्यर्थ वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी किमान २० टीएमसी पाणी या भागाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
नाशिक येथील मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प समन्वय कक्ष) प्रकाश मिसाळ यांना शुक्रवार (दि.२९) रोजी यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले. राज्यातील विविध नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून समुद्रात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी वळवून अवर्षणग्रस्त भागांना देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असून, त्यामध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील या तीन तालुक्यांमध्ये दरवर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते, तर शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीमुळे स्थलांतराचे प्रमाणही वाढते. त्यामुळे नदीजोड प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा लाभ या भागाला देणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.समुद्रात वाहून जाणाऱ्या सुमारे २०० टीएमसी पाण्यापैकी केवळ २० टीएमसी पाणी जरी या भागासाठी उपलब्ध करून दिले, तरी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो. यामुळे शेती, पिण्याचे पाणी, औद्योगिक विकास तसेच जनजीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वासही शिष्टमंडळाने व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आष्टी,पाटोदा,शिरूर तालुकाध्यक्ष, महेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ,पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.या मागणीसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.