व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दूध भेसळीविरोधातील लढा बदनाम करण्याचा कट;अफवा पसरवणाऱ्यांनी पुरावे द्यावेत-प्राजक्ता धस

"नाव न घेता संशय निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार;दोषी कोणताही असो कठोर कारवाईच व्हावी,मंचर परिसरातील दूध व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी"

0

click2ashti-राज्यात दूध भेसळीविरोधात सुरू असलेल्या व्यापक कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांतून नाव न घेता आपल्याबाबत संशय निर्माण करणाऱ्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसारित केल्या जात असून त्या पूर्णपणे निराधार,दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामी करण्याच्या हेतूने प्रसिद्ध केल्या जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ”महानंद”मुंबईच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी केला आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना सूचक पद्धतीने एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे ही पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून नसल्याचे सांगत, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते सार्वजनिक करून संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत,अन्यथा अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या तातडीने मागे घ्याव्यात,अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
प्राजक्ता धस यांनी स्पष्ट केले की,आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात दूध भेसळीविरोधात सातत्याने आणि आक्रमकपणे आवाज उठवला आहे.विधानसभेपासून विविध बैठका आणि दुग्धविकास मंत्र्यांच्या भेटीपर्यंत प्रत्येक स्तरावर त्यांनी हा प्रश्न मांडला. दूध भेसळ हा जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर गुन्हा असून त्यावर कठोर कायदा व्हावा,तसेच अशा प्रकरणांमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी सातत्याने केली असल्याचे त्यांनी नमूद केले.आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाईला वेग आला आहे.मात्र,या कारवाईची धार बोथट करण्यासाठी आणि जनतेचे लक्ष मूळ प्रश्नापासून विचलित करण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून नियोजनबद्ध पद्धतीने अफवा पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्राजक्ता धस यांनी आरोप केला की,शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित काही विशिष्ट राजकीय व्यक्ती दूध भेसळ प्रकरणाची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमे आणि काही प्रसारमाध्यमांतून “बीडमधील आमदाराची पत्नी”,”बड्या नेत्याची पत्नी”अशा शब्दांत बातम्या प्रसिद्ध करून प्रत्यक्ष नाव न घेता संशयाची सुई आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.संबंधित पत्रकारांकडे विचारणा केल्यानंतर “त्या बातमीत तुमचे नाव नाही,”असे उत्तर देण्यात आले. मात्र,नाव न घेता एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा तितकाच गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील एका दूध डेअरीबाबत संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना संदेश पाठवून त्या डेअरीची चौकशी करण्याची मागणी केली होती,असा दावा प्राजक्ता धस यांनी केला.त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नसून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच आमची सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“गेल्या पंधरा वर्षांपासून माझा मंचर येथील दूध संघ किंवा दूध पावडर प्रकल्पाशी कोणताही संबंध नाही,”असे स्पष्ट करत त्यांनी आष्टी तालुक्यात यापूर्वी समोर आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे पुणे जिल्ह्यातील मंचर-आंबेगाव परिसरातील काही दूध संघांपर्यंत पोहोचल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात काहीही पुढे झाले नाही. त्यामुळे आजही मंचर परिसरातील दूध व्यवहारांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.दूध भेसळीविरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच आपल्याविरोधात अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.तसेच स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतरही आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.समाजहिताचे प्रश्न मांडणाऱ्यांना खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अनुभव आम्हाला आल्याचे त्यांनी नमूद केले.प्राजक्ता धस यांनी पुढे दावा केला की,आष्टी दूध संघाने गुणवत्तेच्या कारणास्तव नाकारलेले दूध काही अन्य डेअऱ्यांकडून स्वीकारले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. संबंधित डेअरीकडून बल्क मिल्क कूलर (बीएमसी) चालक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन-तीन महिने दूध पुरवठ्याचे पैसे दिले जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आणि पुरवठादार आर्थिक अडचणीत सापडले असून या संपूर्ण व्यवहाराची निष्पक्ष व सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी आणि मोठे गौडबंगाल समोर येऊ शकते,असा दावाही त्यांनी केला.
पुरावे सार्वजनिक करावेत
ज्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे असतील त्यांनी ते समाजमाध्यमांवर अपप्रचार करण्याऐवजी सार्वजनिक करावेत आणि संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत.”दूध भेसळ हा जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय आहे.या विषयावर राजकारण न करता दोषी कोणताही असो,त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे.मात्र,खोटे आरोप करून दूध भेसळीविरोधात लढणाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जनतेने ओळखावा,” -प्राजक्ता सुरेश धस

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.